Join us

...तर मी पुन्हा राजकारणात येईन

By admin | Published: February 03, 2017 3:10 AM

एक प्रगल्भ अभिनेता, एक सर्वोत्तम टीव्ही होस्ट, एक प्रयोगशील दिग्दर्शक, एक धडपड्या निर्माता, एक हौसी लेखक शिवाय एक अपयशी राजकारणी म्हणून आपण शेखर सुमन

- Rupali Mudholkarएक प्रगल्भ अभिनेता, एक सर्वोत्तम टीव्ही होस्ट, एक प्रयोगशील दिग्दर्शक, एक धडपड्या निर्माता, एक हौसी लेखक शिवाय एक अपयशी राजकारणी म्हणून आपण शेखर सुमन याला ओळखतो. पण शेखर सुमन याची ओळख इथेच संपत नाही. संगीताच्या ध्यासाने झपाटलेला गायक अशी त्याची आणखी एक ओळख आहे. गेल्या आठ ते दहा वर्षांपासून संगीताची आराधना करणारा शेखर लवकरच हजारो श्रोत्यांच्या साक्षीने आपला पहिला लाईव्ह परफॉर्मन्स देणार आहे. मुंबईसह देशाच्या विविध शहरांत शेखरचा ‘दिल से’ नामक लाईव्ह कॉन्सर्ट रंगणार आहे. या कॉन्सर्टदरम्यान शेखर ६० ते ७० च्या दशकातील महान पार्श्वगायक किशोर, रफी, मन्ना डे यांना संगीतमय श्रद्धांजली देणार आहे. याच निमित्ताने शेखरशी साधलेल्या मुलाखतवजा संवादाचा हा सारांश...शेखर,पहिल्या लाईव्ह म्युझिक परफॉर्मन्ससाठी तू सज्ज झाला आहे, याबद्दल काय सांगशील?गेल्या आठ ते दहा वर्षांपासून मी संगीत शिकतो आहे. माझ्यामते, कुठल्याही गोष्टीचा ध्यास मर्यादा ओलांडायला भाग पाडतो. माझ्याबाबतीत असेच म्हणता येईल. संगीताचा ध्यास घेतला आणि या ध्यासाने मी नुसता झपाटलो. किशोर दा, रफी, मन्ना डे यांच्या जादुई आवाजातील गाणी ऐकत आपण मोठे झालो आहोत. या महान गायकांच्या गाण्यांच्या रूपात अभिव्यक्त होण्याचा एक प्रयत्न मी करणार आहे. माझा लाईव्ह परफॉर्मन्स याच प्रयत्नांचा एक भाग आहे. हा प्रयत्न मला गायक म्हणून ओळख देणार आहे. शिवाय एक नवा आत्मविश्वासही देणार आहे. हा तुझा पहिला लाईव्ह परफॉर्मन्स असणार आहे. अशास्थितीत लोकांचा प्रतिसाद कसा असेल, याची काळजी सतावतेयं?लोकांच्या प्रतिक्रिया कशा असतील? चांगला प्रतिसाद मिळेल का? याची भीती मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी असतेच आणि ती असायलाही हवी. पण अपार कष्टानंतर तुम्ही एक आत्मविश्वास कमावता. हा आत्मविश्वास तुम्हाला पुढे जायची शक्ती देतो, प्रेरणा देतो. माझ्या कष्टाचे फळ मला मिळेल, हा माझा आत्मविश्वास आहे. तालमीदरम्यानचे एक गाणे मी सोशल मीडियावर शेअर केले होते. त्याला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लोकांना माझे गाणे आवडले. ही गोष्ट मला नवा हुरूप देऊन गेली.अभिनयाची कारकीर्द सुरु असताना संगीत शिकावे, असा विचार तुझ्या मनात कसा आला?मी याला परमेश्वराची कृपा म्हणेल. माझ्या घराण्याचा तसा संगीताशी दूरदूरपर्यंत संबंध नाही. पण माझ्या आईचा गळा अतिशय गोड होता. माझी मोठी बहीण हिच्या आवाजातही गोडवा आहे. माझी पत्नी, माझा मुलगा हे दोघेही खूप चांगले गातात. इथून कदाचित संगीताची आवड रूजली आणि मी संगीताचा ध्यास घेतला.अ‍ॅक्टर, प्रेझेन्टर,फिल्ममेकर आणि आता सिंगर...यापैकी स्वत:ला कुठल्या भूमिकेत पाहणे तुला सर्वाधिक आवडेल?माझ्यामते, शेखर सुमन वेगवेगळ्या भूमिकेत अभिव्यक्त होतोय. पण या सगळ्या भूमिका एकाच अभिव्यक्तीची विविध रूपे आहेत. मनुष्य प्राणी एकाचवेळी अनेक गोष्टी करू शकतो. परमेश्वराने मानवाला हे वरदान दिले आहे. तुम्ही संपूर्ण आयुष्यात एकच गोष्ट करणार असाल तर अखेरपर्यंत ती एकच गोष्ट करत राहाल. पण वेगवेगळ्या अंगाने अभिव्यक्त होत गेलात तर त्याचा आनंद वेगळा आहे. सगळ्या विद्या, कला एकमेकांशी सुसंगत आहेत. संलग्न आहेत. मी संगीत शिकलो तर मला निश्चितपणे अभिनयात त्याचा फायदा होणार आहे. माझ्या सगळ्या भूमिका अभिनयाशी संलग्न आहे आणि विशेष म्हणजे, माझी प्रत्येक भूमिका मला समाधान व आनंद देणारी आहे.शेखर, तू लवकरच ‘भूमी’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर वापसी करतो आहेस, याबद्दल काय सांगशील?होय. संजय दत्त आणि मी आम्ही दोघेही या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर वापसी करतो आहोत. याचा आनंद आहे. खरे तर शेखर सुमनची व्याख्या करायची झाल्यास. अभिनेता, अशा एकाच शब्दात त्याची व्याख्या करता येईल. मी नवनव्या गोष्टी शिकत असलो, करत असलो. तरी अभिनेता हीच माझी खरी ओळख आहे. मी अभिनेता म्हणून येथे आलो आणि अभिनेता म्हणूनच मरणार. त्यामुळे योग्य भूमिका चालून आली की, त्या संधीचे सोने करण्यासाठी मी उत्सूक असतो. दिग्दर्शक उमंग कुमार यांच्या या चित्रपटाचा प्रस्ताव माझ्याकडे आला आणि मी तो आनंदाने स्वीकारला. सध्या ‘भूमी’चे शूटींग सुरु आहे. मी यात एका टुरिस्ट गाईडची भूमिका करतो आहे.आत्तापर्यंतच्या अभिनय क्षेत्रातील तुझ्या प्रवासाकडे तू कसा बघतोय?मी आता यश आणि अपयशाच्या पलीकडे गेलो आहे. मला आता केवळ सर्वोत्तम काम करायचेय. वेगवेगळ्या भूमिका साकारायच्या आहेत. माझ्या कारकिर्दीची सुरुवात अतिशय यशस्वी चित्रपटाने झाली. पण त्यानंतरच्या काळात मी खूप अपयश पाहिले. या काळात टेलिव्हिजनने मला साथ दिली. पण या अनुभवातून मी खूप शिकलो. यशाप्रमाणेच अपयशालाही तुमच्या आयुष्यात स्थान असले पाहिले. हे अपयश तुमच्या आयुष्याचा तोल ढळू देत नाही. राजकारणातही तू हात आजमावलास. भविष्यात राजकारणात सक्रीय होण्याबाबत तुझी काय योजना आहे.मी लोकसभा निवडणूक लढलो. त्या निर्णयामागे संबंधित पक्षाशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध, काहीसा प्रेमळ दबाव अशी अनेक कारणे होती. पण तो एक चुकीचा निर्णय होता. अर्थात त्याचा पश्चाताप नाही. किंबहुना देश आणि समाजसेवेच्या इराद्याने भविष्यात राजकारण करण्याची संधी म्हणून मी निश्चितपणे राजकारणात येईल.भविष्यातील तुझ्या योजना काय?भविष्यातील योजनांचे नियोजन तुम्ही करूच शकत नाही. त्यामुळे माझ्या तशा काहीही योजना नाही. नियती माझ्यापुढे जे जे काही वाढून ठेवेल, ते ते मी स्वीकारणार हे कायम आहे.