ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - मोहम्मद - द मेसेंजर ऑफ गॉड या चित्रपटाला संगीत दिल्याने मुस्लिम संघटनेने काढलेल्या फतव्याला अखेर संगीतकार ए आर रेहमानने प्रत्युत्तर दिले आहे. मी परंपरावादी असलो तरी तर्कानुसारच विचार करतो, या चित्रपटाला संगीत दिले नसते तर मग पुढे अल्लाला काय उत्तर दिले असते असे उत्तर रेहमानने कट्टरतावाद्यांना दिले आहे.
मोहम्मद - द मेसेंजर ऑफ गॉड या इराणी चित्रपटाला संगीत दिल्याने मुंबईतील रझा अॅकेडमीने संगीतकार ए आर रेहमानविरोधात फतवा काढला होता. या चित्रपटातून मोहम्मद प्रेषित व इस्लाम धर्माचा अपमान झाला असून चित्रपट निर्माते माजिद व ए आर रेहमानने इस्लाम धर्म अपवित्र केला आहे, आता त्यांनी कलमा वाचून इमान बळकट करावे असे या फतव्यात म्हटले होते.
ए आर रेहमानने फेसबुकवर एक पत्रक टाकून या फतव्यावर प्रतिक्रिया दिली. मी इस्लाम धर्माचा विद्वान नाही, मी पाश्चिमात्त्य विचारधारेत राहतो. या चित्रपटाचा मी निर्माता नाही, मी फक्त संगीत दिले आहे असे रेहमान स्पष्ट करतो. या चित्रपटाला संगीत देण्याचा निर्णय मी चांगल्या भावनेनेच घेतला होता. अल्लाने मला प्रसिद्धी, पैसा, सुदृढ आरोग्य दिले मग माझ्यावरील चित्रपटाला संगीत का नाही दिले असा प्रश्न विचारला असता तर त्याला मी काय उत्तर दिले असते असा सवालच त्याने कट्टरतावाद्यांना विचारला आहे.