लखनौ - उत्तर प्रदेश एसटीएफने कुख्यात माफिया अतिक अहमद याचा मुलगा आणि उमेश पाल हत्याकांडातील आरोपी असद व त्याचा साथीदार गुलाम या दोघांचा एन्काऊंटर करत त्यांना ठार केलं. झाशीमध्ये यूपी एसटीएफचे डेप्युटी एसपी नवेंदू आणि डेप्युटी एसपी विमल यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी या दोघांचा खात्मा केला. पोलिसांनी त्यांच्याकडून परदेशी शस्त्रास्त्रेही जप्त केली आहेत. या घटनेनंतर देशभरात योगी सरकारच्या कार्यपद्धतीची चर्चा सुरू आहे. तर, सोशल मीडियावरही योगी आदित्यनाथ ट्रेंड होत आहेत. अनेकांकडून योगी सरकारचं कौतुक होतंय, तर टीकाही केली जातेय. आता, चक्क कॉन्ट्रावर्सी क्वीन कंगना रणौतनेही योगी सरकारचं कौतुक केलंय.
एन्काऊंटरच्या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, त्यांनी, आरोपी और माफिया वालों को मिट्टी मे मिला देंगे असे म्हणत इशारा दिल्याचे दिसून येत आहे. तर, सोशल मीडियावरही योगीच ट्रेंड होत आहेत. योगींनी करुन दाखवलं, बुलडोझर बाबा ने कर दिखाया, यांसह अनेक मिम्स आणि योगी आदित्यनाथ यांच्या सरकारचं कौतुक होत आहे. आता, कंगना रणौतनेही या व्हिडिओ शेअर योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलंय. विशेष म्हणजे तिने योगी आदित्यनाथ यांना आपला भाऊ असं संबोधलंय. 'माझ्या भावासारखा दुसरा कोणीही नाही, असे म्हणत तिने योगी आदित्यनाथ यांना मेंशन केलंय.
दरम्यान, कंगनाने शेअर केलेला व्हिडिओ चकमकीच्या घटनेवर बनवण्यात आला असून त्यात योगींचं कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून होत असल्याचं दिसून येतंय. आरोपींचा एन्काऊंटर केल्याचं समर्थन या व्हिडिओत करण्यात आलंय. हा व्हिडिओ कंगनाने शेअर केला आहे.
असा केला एन्काऊंटर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, असद आणि मोहम्मद गुलाम झाशीतील परिछा धरणाजवळ लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला, यावेळी आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला. त्या गोळीबाराला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही त्या दोघांवर गोळीबार केला, यात दोघेही जागीच ठार झाले. युपी पोलिसांच्या या कारवाईमुळे योगी आदित्यनाथ याचं सरकार पुन्हा चर्चेत आलं आहे. सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विधानसभेत बोलताना त्यांनी, मिट्टी मे मिला देंगें असे म्हणत युपीतील गुंडगिरीला इशाराच दिला होता.
मुख्यमंत्र्यांकडून एसटीएफचे कौतुक
उमेश पाल हत्याकांडातील फरार असद अहमद आणि शूटर गुलाम यांच्या एन्काऊंटरवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी अधिकाऱ्यांचे कौतुक केले. यासोबतच कायदा आणि सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्र्यांनी मोठी बैठक बोलावली आहे. सीएम योगी यांनी यूपी एसटीएफ तसेच डीजीपी, विशेष डीजी कायदा आणि सुव्यवस्था आणि संपूर्ण टीमचे कौतुक केले. प्रधान सचिव गृह संजय प्रसाद यांनी मुख्यमंत्र्यांना या चकमकीची माहिती दिली. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात आला आहे.
अखिलेश यादव यांच्याकडून चौकशीची मागणी
खोटे एन्काऊंटर करुन भाजप सरकार खऱ्या मुद्द्यांपासून दूर पळत आहे. भाजपावाले न्यायालयावर विश्वासच करत नाहीत. आजच्या या एन्काऊंटरचा कसून तपास करावा आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केली. तसेच, भाजपा बंधुप्रेम जपण्याविरुद्ध आहे, चूक-बरोबर याचा निर्णय घेण्याचा अधिकार सत्तेचा नाही, असे म्हणत या एन्काऊंटवरच्या घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी यादव यांनी केली आहे.