Join us

‘फँटम’मध्ये पाकविरुद्ध काहीही नाही

By admin | Published: August 27, 2015 5:02 AM

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांवर आधारित माणुसकीचा संदेश देणारा ‘बजरंगी भाईजान’ ज्या पद्धतीने पाकिस्तानात लोकप्रिय झाला ते पाहता न बघताच

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांवर आधारित माणुसकीचा संदेश देणारा ‘बजरंगी भाईजान’ ज्या पद्धतीने पाकिस्तानात लोकप्रिय झाला ते पाहता न बघताच ‘फँटम’ला तेथे बंदी घातली जाईल, असे वाटले नव्हते, अशा शब्दांत दिग्दर्शक कबीर खान यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कबीर खान यांनी या चर्चेत त्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, पाकिस्तानचे सेन्सॉर बोर्ड हा चित्रपट पाहून निर्णय घेईल, असे आम्हाला वाटले होते. आमचा चित्रपट प्रदर्शित होण्यावरून तेथील न्यायालयात हाफीज सईदने केलेल्या याचिकेवर न्यायालयाने चित्रपट बंदीचा निर्णय घेतला ते ऐकून आम्हाला धक्काच बसला.’’ या निर्णयाला कबीर खान तेथील राजकीय व्यवस्थेशी जोडतात. लोकांना चित्रपट बघायची संधी दिली जाणे गरजेचे होते. कारण त्यानंतरच त्यांना हे लक्षात आले असते की हा चित्रपट पाकिस्तानच्या विरोधात नाही. बेकायदेशीररीत्या सीडी बनवून फँटम बघितला जाईल हेही मला माहिती आहे. त्यातून आम्हाला काय म्हणायचे आहे हे त्यांना समजेल, अशी आशा आहे, असे खान म्हणतात. आमचा हेतू व प्रयत्न एवढाच आहे की ज्यांनी मुंबईत २६/११ हल्ल्याची अंमलबजावणी केली त्यांच्याबद्दलच आम्हाला बोलायचे आहे. असे असताना चित्रपट पाकिस्तानी लोकांच्या विरोधात असल्याचे कसे समजता येईल? ‘फँटम’च्या आधीचा कबीर खान यांनी दिग्दर्शित केलेला ‘एक था टायगर’वरही पाकिस्तानात बंदी घालण्यात आली होती. ते म्हणतात, ‘‘त्या वेळीही मला धक्का बसला होता कारण त्यात पाकिस्तानविरोधात काहीही नव्हते. हा चित्रपट दोन गुप्तचर एजन्सींचा विषय घेऊन तयार झाला होता. त्यातही पाकिस्तानी लोकांविरोधात काहीही नव्हते.’’ कबीर खान म्हणतात, ‘‘पाकिस्तानचे सामान्य नागरिक आमच्यासारखेच असून त्यांनाही प्रेमाने राहायला आवडते. परंतु प्रश्न राजकीय व्यवस्थेचा आहे व अशा व्यवस्थेला तोंड देणे कधीही सोपे नसते.’’मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना तुम्ही कसे संपविले, असे विचारता कबीर खान उत्तर न देता चित्रपटच आता बघा, असे सांगतात. ‘फँटम’नंतर तुमचा पुढील चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवाद पसरविणाऱ्या इस्लामिक संघटना आयएसआयएसच्या (इसिस) विषयावर असेल का, असे विचारल्यावर कबीर खान यांच्या डोळ्यांत चमक दिसली. परंतु त्यांनी या प्रश्नाचे थेट उत्तर दिले नाही, पण त्याचा इन्कारही केला नाही. त्यांचे म्हणणे असे आहे की, त्या दहशतवाद्यांचे क्रौर्य हे सगळ्या जगासाठीच मोठे आव्हान बनले आहे व अशा विषयावर चित्रपट बनविणे हेदेखील मोठे आव्हान असेल. ‘इसिस’ भारतात सक्रिय झाल्याच्या प्रश्नाला त्यांनी फेटाळून लावले. ते म्हणाले की, जम्मू व काश्मीरमध्ये इसिसचे चार-दोन झेंडे फडकले म्हणजे ते आमच्या येथे येऊ शकतात, असे समजणे योग्य होणार नाही.-----------------------आमचा चित्रपट दहशतवादाच्या विरोधात -  सैफ अली खानया चित्रपटाचा नायक सैफ अली खानने कतरिना कैफसोबत रेसनंतर पुन्हा एकवार काम केले आहे. चित्रपटातील आपल्या भूमिकेबद्दल तो म्हणतो की, ‘‘चित्रपटात मी काश्मीरचा युवक असून शिस्तभंगाच्या कारणास्तव लष्करातून बाहेर पडावे लागल्यानंतर आपल्याच कोषात शांततेने जीवन जगत असतो. अचानक ‘रॉ’कडून एका कामगिरीचा (मिशन) प्रस्ताव येतो. या प्रस्तावाचा हेतू मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांपर्यंत पोहोचायचा आहे. हा प्रस्ताव तो स्वीकारतो. ‘फँटम’ कोणताही देश किंवा धर्माविरुद्ध नसून फक्त आणि फक्त दहशतवाद्यांविरुद्ध आवाज बुलंद करतो. कबीर खान कधीही कोणत्याही देशाविरुद्ध चित्रपट बनविणार नाही याबद्दल माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. तो असे कधीही करणार नाही, असे सैफ म्हणाला. ‘फँटम’ पाकिस्तानात प्रदर्शित व्हावा असे आम्हाला वाटत होते, परंतु असे आता होणार नाही.सैफ अली खानने याआधी ‘एजंट विनोद’ चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात त्याने एका भारतीय एजंटची भूमिका साकारली आहे जो की एका सत्याचा शोध घेत पाकिस्तानात जातो. योगायोगाची गोष्ट अशी की ‘एजंट विनोद’वरही पाकिस्तानात बंदी घालण्यात आली होती. या दोन्ही चित्रपटांची तुलना करणे योग्य होणार नाही, असे सैफ अली खानला वाटते. या दोन्ही चित्रपटांचा विषय आणि हाताळणी अगदीच वेगवेगळी आहे. ‘फँटम’ हा गंभीर विषयावरील चित्रपट असून ‘एजंट विनोद’ हा मसाला चित्रपट होता, असे तो म्हणाला. सैफ त्याच्या याआधीच्या काही चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर प्रभावी कामगिरी न केल्याबद्दल काळजीत दिसला नाही. त्याचे म्हणणे असे की तो तर प्रत्येक चित्रपटात खूप कष्ट करतो. तरीही चित्रपट चालला नाही तर त्यातूनही काही तरी त्याला शिकायला मिळतेच व मग तो नव्या चित्रपटात जास्त कष्टाने काम करतो. सैफ अली खानला विचारण्यात आलेला एक प्रश्न त्याच्या मुलांशी संबंधित होता. त्यावर तो थोडासा त्रासलेला दिसला. कारण त्याचा मुलगा इब्राहिमचा एक फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला. त्याआधी काही दिवस त्याची मुलगी सारा ही चित्रपटात काम करणार, अशी जोरदार चर्चा झाली. या दोन्ही मुलांच्या भवितव्याबद्दल सैफने सध्या ते दोघेही शिकत आहेत. एकदा शिक्षण पूर्ण झाले की आपले भविष्य कसे असावे याचा निर्णय घेण्याचा त्यांना हक्क असेल व मी वडील या नात्याने त्यांच्या पाठीशी असेल, अशा शब्दांत आपली भूमिका स्पष्ट केली.फ्लॉप सिनेमांची पर्वा नाहीसैफ अली खान जेव्हाही मीडियाशी बोलतो, तो आपल्या मूडबाबत फार जागरूक असतो. आपली बातचीत मैत्रीपूर्ण असावी यावर त्याचा भर असतो. फँटमबाबत होणाऱ्या चर्चेत त्याला ‘मागील काही चित्रपट अयशस्वी ठरले आहेत, त्यामुळे फँटमविषयी एक प्रेशर निर्माण झाले आहे काय’ हा प्रश्न विचारला. मात्र तो त्याला आवडला नाही. या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी तो काही वेळ विचार करीत होता. मग मात्र एखाद्या तत्त्वज्ञासारखे उत्तर देत म्हणाला, ‘फ्लॉप सिनेमांनी मला कोणताच फरक पडत नाही आणि अशा गोष्टींची पर्वादेखील करीत नाही.’ बाप जागा झाला सैफचा मुलगा इब्राहिम व श्रीदेवीची मुलगी जान्हवी यांचा फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला. सीएनएक्समध्ये १४ आॅगस्टच्या अंकातदेखील ही बातमी फोटोसह प्रसिद्ध झाली होती. आपल्या मुलाचा फोटो पाहून तो आधी आश्चर्यचकित झाला. हा फोटो तुम्हाला कुठे मिळाला, असा प्रश्न त्याने केला. मात्र आपल्या मुलाचा बचाव करीत तो म्हणाला, हा फोटो एका पार्टीतला आहे. कुणी तरी काढून तो नेटवर टाकला असेल. जेव्हा त्याला हा फोटो कुठून आला व तो कुणी छापला याची माहिती दिली त्या वेळी तो चकितच झाला. आपल्या मुलाचा बचाव न करता त्याने आपल्या मोबाइलवरून या बातमीचा एक फोटो काढला व आपल्या मुलाला पाठविला. सोबतच अशा बातम्या मीडियात पुन्हा येऊ नये, अशी ताकीद देणारा मेसेजही पाठविला. ---------------------------------एवढा वास्तववादी चित्रपट बनविणे सोपे काम नाही -  कतरिना क तरिना कैफला तुझी नेमकी भूमिका काय असे विचारता तिने ‘रॉ’ची एजंट अशी भूमिका साकारल्याचे तिने सांगितले. चित्रपटात ती सैफ अली खानच्या मिशनमध्ये त्याच्यासोबत काम करते व दोघे मिळून ती कामगिरी तडीस नेतात. ही भूमिका आणि चित्रपटाची खास वैशिष्ट्ये विचारली असता कतरिना म्हणाली की, हा चित्रपट कबीर खानने बनविला आहे हीच याची खास बाब आहे. चित्रपटाबद्दल बोलायचे तर हा खूपच वस्तुस्थितीला धरून आहे. चित्रपटातील तिच्या धाडसी दृश्यांबद्दल सध्या खूप चर्चा होत आहे. यावर ती म्हणाली की, ती दृश्ये माझ्या भूमिकेची गरज होती. आम्ही जेव्हा चित्रीकरण करत होतो तेव्हा आमच्या सगळ्यांचा एकच उद्देश होता तो हा की आपण सगळ्यांनी आपल्यातील सर्वोत्तम द्यायचे. माझाही तोच प्रयत्न होता. ‘फँटम’वर पाकिस्तानात बंदी आहे हा विषय निघाला तेव्हा पाकिस्तानात बंदी घालण्यात आलेला कतरिना कैफचा हा तिसरा चित्रपट झाला आहे. याआधी तिचा ‘एक था टायगर’ व ‘जब तक है जान’वर बंदी होती. हा केवळ योगायोग आहे एवढेच ती समजते. तेथील लोकांना कमी समज आहे, असे समजले जाते. तेथील लोकांना हे समजते व माहितीही आहे की हिंदी चित्रपटांमध्ये त्यांच्याविरोधात काहीही नसते. कतरिनाला वाटते की असे बंदीचे निर्णय निराशाजनक असतात, परंतु धक्कादायक नसतात. कारण तेथे असे काही घडू शकते अशी शंका मनात होती. ‘न्यूयॉर्क’, ‘एक था टायगर’नंतरचा कतरिनाचा ‘फँटम’ हा तिसरा चित्रपट आहे. ती कबीर खान यांची तोंड भरून स्तुती करते. ती म्हणते, तो आपल्या चित्रपटासाठी भरपूर कष्ट करतो व आपल्या कलावंतांना काही वेगळे करण्याची संधीही देतो. अशा अ‍ॅक्शन, थ्रिलर चित्रपटांत नायिकेला काही विशेष काम नसते या प्रश्नाला ती मान्य करीत नाही. ती म्हणते, ‘फँटम’ बघून हा समज दूर होईल.आपल्याच बातमीत रमली सीएनएक्स चाळत असताना अचानक कॅटची नजर शेवटच्या बॉलीवूड पानावर गेली. १४ आॅगस्ट रोजी प्रकाशित या अंकात अगदी वरच्या भागाला ‘कॅटरिना आॅन टाइम’ ही कॅटची बातमी प्रसिद्ध झाली आहे. या बातमीचे कॅटने बारकाईने अवलोकन केले व या बातमीसाठी सीएनएक्सचे आभारही मानले. हा ‘मग’ सांभाळून ठेवाफँटमच्या टीमसोबत लोकमतची चर्चा होत असताना कतरिना कै फकडे पाहून असे वाटत होते की तिचे लक्ष कुठे तरी दुसरीकडे लागले आहे. तशी कतरिना मीडियाशी बोलताना फार सीरिअस असते व प्रश्नाची उत्तरे तोलून मापून देते. मात्र येथील चित्र जरा वेगळेच होते. ती ‘टी मग’ (ज्यावर तिने आपला आॅटोग्राफ दिला होता) सोबत खेळत होती. पाहता पाहता तिने ‘टी मग’वर फुलांची चित्रे काढली. आपल्या चित्रांना पाहून ती खूश झालीच यासोबतच ‘या मगवर काढलेले डिझाइन्स सांभाळून ठेवा’ असा सल्लाही तिने दिला.