मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) इंडस्ट्रीत पदार्पण करण्याआधी ते लॉटरीची तिकिटे विकत होते. त्यांनी आपल्या अभिनय आणि विनोदी कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. १९८४ साली आलेला चित्रपट लेक चालली सासरला, १९८५ साली धूमधडाका चित्रपटातून लक्ष्मीकांत यांना खूप लोकप्रियता मिळाली. त्यांनी विनोदी भूमिकांसोबतच गंभीर भूमिकाही तितक्याच दमदार पद्धतीने साकारल्या. मात्र त्यांचे निधन सगळ्यांच्या जीवाला चटका लावून गेले. पण निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. पत्नी प्रिया बेर्डे यांनी एकट्यांनी अभिनय आणि स्वानंदीचा सांभाळ केला. नुकतेच सौमित्र पोटे यांच्या 'मित्र म्हणे' या युट्यूबवरील पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत प्रिया बेर्डे यांनी त्यांना लक्ष्मीकांत बेर्डेंच्या निधनानंतर किती संघर्ष करावा लागला, याबद्दल सांगितले.
कलाविश्वात वावरत असताना सिंगल मदर म्हणून मुलांना वाढवणं कठीण गेले का, असे प्रिया बेर्डेंना एका मुलाखतीत विचारण्यात आले. त्यावेळी त्या म्हणाल्या की, हो. मला माझ्या मुलांना माझापासून लांब ठेवावे लागले. ते दोघे हॉस्टेलमध्ये वाढले. मला आई-वडिल, सासू-सासरे, भाऊ -बहिण नाही. जरी असते तरी त्यांनी माझ्या मुलांचा सांभाळ करावा, अशी अपेक्षा केली नसती. माझ्या सासरचे नातेवाईक आहेत, पण प्रत्येकाला प्रत्येकाचे संसार आहेत. त्यामुळे लक्ष्मीकांत गेल्यानंतर कोणीच नव्हते माझ्या आयुष्यात. त्यावेळी मला मुलांना नाईलाजास्तव हॉस्टेलला ठेवावं लागलं. ते दोघे पुण्याला सिंहगडला हॉस्टेलमध्ये होते, दहावीपर्यंत माझी मुले तिकडेच होती. त्या त्यांच्या मुलांना महिना-दोन महिन्यांनी मोठे होताना पाहत होत्या'
प्रिया बेर्डे झाल्या भावुकत्या पुढे म्हणाल्या की, 'लक्ष्मीकांत आजारी असताना मला समजले होते की हे काही आता ठीक नाही, हे पर्व आता संपत आले आहे, तेव्हा मला जाणवले की आता कुठेतरी आपल्याला सिंधूताई व्हावे लागणार आहे. आपल्याला जगावे लागणार आहे. त्यावेळी मी तीन मुलांना सांभाळत होते.' हे सांगताना प्रिया बेर्डे यांना रडू कोसळले. त्यावेळी ज्या परिस्थितीला मी सामोरे गेले होते त्याबाबत आठवण झाली की असे वाटते की, मी कशी ती परिस्थिती सांभाळली? लक्ष्मीकांत, माझे आई-वडील निघून गेल्याचे मी स्वीकारले होते. मात्र त्या परिस्थितीतून जाताना मी जे सहन केले ना ते कोणीच नाही सहन करू शकत. तुमच्याबरोबर कोणीच नाही, तुम्ही त्यावेळी एकट्या असता, असे प्रिया बेर्डे म्हणाल्या.