Join us  

सासू-सुनेचा जमाना गेला

By admin | Published: July 09, 2016 2:34 AM

छोट्या पडद्यावर सन २०००च्या सुमारास आपल्याला सगळ्याच मालिका सासू-सूनेच्या अवतीभवती फिरणाऱ्या पाहायला मिळत होत्या. पण आता जमाना बदललाय असे आपल्याला

छोट्या पडद्यावर सन २०००च्या सुमारास आपल्याला सगळ्याच मालिका सासू-सूनेच्या अवतीभवती फिरणाऱ्या पाहायला मिळत होत्या. पण आता जमाना बदललाय असे आपल्याला म्हणावे लागेल. आता छोट्या पडद्यावर सासू-सुनेपेक्षा प्रेमकथा आणि सुपरनॅचरल पॉवरवर आधारित मालिका जास्त गाजतात असे गेल्या काही वर्षांत पाहायला मिळत आहे.काही वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर सासू-सुनेचे वर्चस्व होते. कोणतीही मालिका सासू-सुनेशिवाय बनवली जाऊ शकत नव्हती. ‘साँस भी कभी बहू थी’, ‘कोई अपना सा’, ‘कोशिश-एक आशा’ यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये तर ‘चार दिवस सासूचे’सारख्या मराठी मालिकेत आपल्याला सासू-सुनेचा दबदबा पाहायला मिळाला होता. पण गेल्या काही वर्षांत सासू-सुना या छोट्या पडद्यावरून गायब झालेल्या आहेत. प्रेक्षकांना सासू-सुनांच्या भांडणांचा कंटाळा आलेला असल्याने वाहिनीनींदेखील यांना आपल्या मालिकांच्या पटकथांपासून दूर ठेवले आहे असे म्हणायला हरकत नाही. दूरदर्शनच्या काळात मालिका या आठवड्यातून एकदा दाखवल्या जात असत. तसेच त्या वेळी आजसारखी टीआरपीची स्पर्धाही नव्हती. त्यामुळे त्या काळातल्या ‘बुनियाद’, ‘हम लोग’ यांसारख्या मालिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. पण टीआरपीची स्पर्धा सुरू झाल्यानंतर सगळ्याच गोष्टी पूर्णपणे बदलल्या. टीआरपीनुसार आठवड्याला मालिकांच्या कथा बदलल्या जातात. नवनवीन पात्रांना टीआरपी वाढविण्यासाठी मालिकेत एंट्री दिली जाते. या सगळ्यामुळे मूळ कथा पूर्णपणे भरकटते. २०००च्या सुमारास बालाजी प्रोडक्शनची ‘क्योंकी साँस भी कभी बहू थी’ ही मालिका सुरू झाली होती. या मालिकेला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. या मालिकेतील मिहीर ही व्यक्तिरेखा तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. मिहीरचे मालिकेत निधन झाल्याचे दाखविल्यानंतर प्रेक्षकांनी अक्षरश: गोंधळ घातला होता. निर्मात्यांना प्रेक्षकांच्या आग्रहास्तव मालिकेत मिहीरला परत आणावे लागले होते. या मालिकेला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमानंतर सासू-सुनेच्या साच्यातल्या अनेक मालिका छोट्या पडद्यावर सुरू झाल्या होत्या. यातील अनेक मालिकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला होता. पण नंतरच्या काळात प्रेक्षकांना अशा प्रकारच्या मालिका या कंटाळवाण्या वाटू लागल्या. सासू-सुनांच्या भांडणांचा कंटाळा आल्याने प्रेक्षकांनी अशा मालिकांकडे तोंड फिरवायला सुरुवात केली. छोट्या पडद्यावरचे प्रसिद्ध कलाकारही अशा मालिकांना वाचवू शकले नाहीत. प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने सध्या सासू-सून हा फॉर्म्युलाच छोट्या पडद्यावरून गायब झालेला आहे. सध्या छोट्या पडद्यावर लव्हस्टोरीचा फिव्हर आपल्याला पाहायला मिळत आहे. लव्हस्टोरीवर आधारित असलेल्या मालिका नेहमीच छोट्या पडद्यावर हिट झालेल्या आहेत. ‘कसोटी जिंदगी की’, ‘कही तो होगा’, ‘कबूल है’ यांसारख्या मालिकेतील प्रेमकथा प्रेक्षकांना खूप आवडल्या होत्या. सध्या ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’, ‘ये हे मोहोब्बते’ या मालिकांमधील प्रेमकथा प्रेक्षकांना भावत आहेत. तरुणांच्याच प्रेमकथा केवळ प्रेक्षकांना आवडतात असे नाही, तर मध्यमवयीन जोडप्याची प्रेमकथाही प्रेक्षक डोक्यावर घेऊ शकतात हे आपल्याला ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेमुळे दिसून आले होते. प्रेमकथेसोबतच सध्या छोट्या पडद्यावर सुपरनॅचरल पॉवरचा बोलबाला आहे. ‘नागिन’, ‘ससुराल सिमर का’, ‘ये है मोहोब्बते’ यांसारख्या मालिकेत आपल्याला सुपरनॅचरल पॉवर असलेले कॅरेक्टर्स पाहायला मिळत आहेत. या तिन्ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये नेहमीच अव्वल ठरल्या होत्या. ‘नागिन’ या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला असून, तिथे ‘कवच... काली शक्तियो से’ ही मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतही अशा सुपरनॅचरल पॉवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मालिकेने पहिल्याच आठवड्यात टीआरपी रेसमध्ये पहिला नंबर मिळवला आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करता प्रेक्षकांची आवड आता बदललेली आहे असेच म्हणावे लागेल. सासूचा छळ सहन करणारी, तरीही सासूला मान देणारी, कुटुंबातील सगळ्या चिंतेचा भार वाहणारी सून आता प्रेक्षकांना नकोशी झाली आहे. यापेक्षा प्रेक्षकांना प्रेमकथा आणि सुपरनॅचरल पॉवर असलेल्या मालिका पाहण्यात अधिक रस आहे असेच म्हणावे लागेल.

- prajakta.chitnis@lokmat.com