Join us

नितीन देसाईंच्या एन. डी. स्टुडिओला २०२१ मध्ये लागली होती भीषण आग, सुबोध भावे म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2023 1:39 PM

Subodh Bhave on Nitin Desai Sucide : सुबोध भावेने नितीन देसाईंच्या निधनावर हळहळ व्यक्त केली आहे. यावेळी सुबोध भावेने २०२१ साली नितीन देसाई यांच्या स्टुडिओला लागलेल्या आगीचाही संदर्भ देत म्हटले की, कोणत्याही संकटात ते डगमगणारे नव्हते.

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Chandrakant Desai) यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी कर्जतच्या एन डी स्टुडिओतच आपले जीवन संपवले. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आठवणी कलाकार सांगत आहेत. दरम्यान सुबोध भावे(Subodh Bhave)ने नितीन देसाईंच्या निधनावर हळहळ व्यक्त केली आहे.  यावेळी सुबोध भावेने २०२१ साली नितीन देसाई यांच्या स्टुडिओला लागलेल्या आगीचाही संदर्भ देत म्हटले की, कोणत्याही संकटात ते डगमगणारे नव्हते.

कर्जतमधील नितीन देसाईंच्या स्टुडिओला २०२१ साली भीषण आग लागली होती. ही आग दुपारी १२च्या सुमारास लागली होती. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अग्निशमन दल आग विझवण्याचे काम करत होते. सेटच्या शेजारी एक रेल्वे रुळ आहे. या रुळावर कोणीतरी कोरडे गवत पेटवून फेकले होते. त्यामुळे गवताला लागलेली आग सेटपर्यंत पोहोचली होती. या आगीत २००८ साली रिलीज झालेला जोधा अकबरचा सेट जळून खाक झाला होता. ही घटना फार गंभीर होती. मात्र या दुःखावरही मात केल्याचे सुबोध भावने एबीपी माझाला सांगितले.

''त्याच्याकडे पाहून आम्हाला बळ मिळायचं''नितीन देसाई लढवय्या होता. अनेक संकटांना त्याने तोंड दिले आहे. मागील वर्षी त्याच्या स्टुडिओला आग लागली होती. त्यातूनही तो बाहेर पडला. स्टुडीओ पुन्हा सुरू केला. त्यामुळे तो छोट्या मोठ्या संकटांना डगमगणारा कधीच नव्हता. त्याच्याकडे पाहून आम्हाला बळ मिळायचे की काम कसे करावे, स्वप्न कशी साकार करायची हे त्याच्याकडे पाहून शिकलो, असे सुबोधने म्हटले. 

''स्वतःचे आयुष्य असे बेरंग का केले?''

सुबोध पुढे म्हणाला की, प्रभातच्या काळात स्वतःचा स्टुडिओ असणारा एकमेव निर्माता होता तो म्हणजे नितीन देसाई. ज्याने उत्तमोत्तम कलाकृती दिल्या आहेत. त्याच्या कला दिग्दर्शनाने त्या कलाकृती पडद्यावर आणखी सुंदर दिसायच्या. इतकी सुंदर चित्र घडवणाऱ्या आमच्या मित्राने स्वतःचे आयुष्य असे बेरंग का केले याचे उत्तर सापडले पाहिजे. तो जास्त बोलणाऱ्यातला नव्हता. स्वतःच्या अडचणी कोणाला दाखवल्या असतील असे वाटत नाही. आमच्यात नियमित बोलणे होत होते. गेल्या महिन्यात त्याच्या स्टुडिओत गेलो होतो, तेव्हा त्याने त्याचा स्टु़डिओ दाखवला होता. परवाही आम्ही भेटणार होतो, पण ते पुढे गेले.

टॅग्स :नितीन चंद्रकांत देसाईसुबोध भावे