Join us

मराठी चित्रपटसृष्टीतील 'या' आहेत सेलिब्रेटी सिस्टर्स, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2021 8:00 AM

मराठी कलाविश्वात जशी स्टार्स आणि स्टार किड्सची जोडी आपल्याला पाहायला मिळते, तशीच सख्या बहिणींची जोडीही मनोरंजन क्षेत्रात काम करत आहेत.

मराठी कलाविश्वात जशी स्टार्स आणि स्टार किड्सची जोडी आपल्याला पाहायला मिळते, तशीच सख्या बहिणींची जोडीही मनोरंजन क्षेत्रात काम करत आहेत. आपल्या बहिणीच्याच पावलावर पाऊल ठेवत नाटक, मालिका आणि सिनेमांमधून ह्या कलाकार बहिणी आपले स्थान निर्माण करत आहेत.  आज अनेक सेलिब्रिटी बहिणींच्या जोड्या मालिका-सिनेमांमधून  रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाल्या आहेत. पण कदाचित रसिकांनाच खऱ्या आयुष्यात या अभिनेत्रींच्या सख्या बहिणी फारशा ठाऊक नसतील. म्हणून या सेलि्ब्रिटी बहिणींविषयी आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. 

वंदना गुप्ते आणि भारती आचरेकर 

वंदना गुप्ते आणि भारती आचरेकर या दोघींही सख्या बहिणी.. मराठी सिनेविश्वातल्या दिग्गज अभिनेत्री म्हणून दोघींनीही नाव कमावले आहे. अनेक मालिका, सिनेमे आणि नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. इतकेच नव्हे तर उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच त्या एक उत्तम गायिका सुद्धा आहेत. त्यांच्या आई माणिक वर्मा या भारतीय संगीत क्षेत्रातल्या खूप मोठ्या शास्त्रीय गायिका होत्या. मराठीच नाही तर हिंदी कलाविश्वात सुद्धा या दोघी बहिणी आपल्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत.  

 पूर्णिमा तळवलकर आणि पल्लवी वैद्य 

छोट्या पडद्यावरची पूर्णिमा आणि पल्लवी या सख्या बहिणी. या दोघी बहिणी आहेत हे अनेकांना ठाऊकच नसेल. या दोघींचे माहेरचे आडनाव भावे आहे. अनेक लोकप्रिय मालिकांमधून या दोघी महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखांमधून रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येतात. पूर्णिमाने दिवंगत प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि निर्मात्या स्मिता तळवलकर यांच्या पुतण्याशी लग्न केले. तर पल्लवीचे पती केदार वैद्य हे दिग्दर्शक आहेत. स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत पल्लवीने साकारलेली पुतळा राणीसाहेबांची भूमिका लक्षवेधी ठरली. तर पूर्णिमाने अनेक मराठी मालिका गाजवल्या आहेत. सध्या रंग माझा वेगळा या मालिकेमधील राधा आई या भूमिकेमुळे ती विशेष चर्चेत आहे.  

भार्गवी चिरमुले आणि चैत्राली गुप्ते 

भार्गवी आणि चैत्राली ही सिनेविश्वातली सख्या बहिणींची जोडी. भार्गवीने मोलकरीणबाई, वहिनीसाहेब अशा मालिकांमधून तर संदूक, वन रुम किचन अशा सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनात आपलं  वेगळं स्थान निर्माण केलं . भार्गवी एक कुशल नृत्यांगना सुध्दा आहे. तिने सेलिब्रिटी नृत्याच्या रिएलिटी शोचं विजेतेपदही पटकावलंय. तर तिची बहिण चैत्राली सुद्धा उत्तम अभिनेत्री आहे.  

मृण्मयी आणि गौतमी देशपांडे

मृण्मयी देशपांडेच्या पावलावर पाऊल ठेवत तिची धाकटी बहिण गौतमीने सुद्धा मालिका विश्वात आापल्या अभिनयाची जादू दाखवत प्रेक्षकांच्या मनात सर्वांतच असं वेगळं स्थान निर्माण केलं . मृण्मयीने अग्निहोत्र या मालिकेतून कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर अनेक मालिका आणि सिनेमे गाजविल्यानंतर मृण्मयी एक यशस्वी दिग्दर्शिका सुद्धा बनली आहे. तर गौतमी साकारत असलेली माझा होशील ना या मालिकेतील सई सुद्धा प्रचंड गाजतेय. गौतमी एक अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम गायिका देखील आहे. 

तितिक्षा तावडे आणि खुशबू तावडे 

छोट्या पडद्यावरच्या या तावडे सिस्टर्स सोशल मिडीयावर सुध्दा  नेहमीच चाहत्यांचं मनोरंजन करताना पाहायला मिळतात. तितिक्षाने सरस्वती, तू अशी जवळी रहा या मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारलीये. तर खुशबूची आम्ही दोघी मालिकेतील भूमिका प्रचंड गाजली.  या दोघींनीही हॉटेल मॅनेजमेंटच शिक्षण घेतलं आहे... मागच्यावर्षीच त्यांनी मुंबईतील मालाड येथे साईड वॉल्क कॅफे नावाचा कॅफे सुरु केला आहे.

 

टॅग्स :मृण्मयी देशपांडेगौतमी देशपांडेवंदना गुप्तेतितिक्षा तावडेभार्गवी चिरमुले