ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - नेहमीपेक्षा वेगळया कथानकामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनावर अधिराज्य करणारी ' रात्रीस खेळ चाले' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे, याची माहिती आम्ही तुम्हाला नुकतीच दिली होती. मात्र या मालिकेतील गूढ नेमके काय, खुनी कोण? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना अद्यापही मिळाली नसून मालिकेता शेवट नेमका कसा होणार याबाबत सर्वांच्या मनात उत्सुकता आहे. नेने वकील आणि अजय यांचा खरा खुनी कोण याबाबतची उत्सुकता ताणली गेली असून शेवटच्या भागापर्यंत हे गुपित दडवून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी केला. मात्र मालिकेचे रहस्य आता उलगडले असून ख-या खुन्याचा शोधही लागला आहे. या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानची काही छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्या छायाचित्रांत पोलीस माधवाची बायको निलीमा व सुषमा उर्फ सुशल्या या दोघींच्या हातात बेड्या घालून नेताना दिसत आहेत. त्यामुळे या दोघीच अजय व नेने वकील यांच्या खुनी असल्याचे दिसत आहे. निलीमा व सुषमाने त्या दोघांचा का खून केला हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नसून येत्या काही भागांतच प्रेक्षकांना पडलेल्या या प्रश्नांचीही उकल होईल असे दिसते.
- भूत, प्रेत, आत्मा, पिशाच्च या कथानकामुळे पहिल्या भागापासून ही मालिका चर्चेत आली. पण अशा घटनांमधून कोकणची बदनामी होत असल्याचा आरोप झाल्यामुळे या मालिकेचा ट्रॅक बदलण्यात आला. ट्रॅक बदलल्यानंतरही ही मालिका रंजक वळणावर असताना आता ती प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत कोकणातील नाईक कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. या कुटुंबाभोवती एक गूढ असून, काही अदृश्य शक्तींमुळे ब-याचवर्षांपासून या कुटुंबात कुठलेही मंगल कार्य झाले नसल्याचे त्यात दाखवण्यात आले आहे.कोणतेही प्रथितयश कलाकार नसतानाही या मालिकेतील व्यक्तिरेखा आज घराघरांत लोकप्रिय ठरल्या असून ही मालिका आता दोनशे भागांच्या टप्प्यावर उभी आहे. मात्र लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून २२ ऑक्टोबरला ' रात्रीस खेळ चाले' चा शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे. त्याऐवजी आदिनाथ कोठारे- तेजस्विनी पंडित यांची मुख्य भूमिका असणारी ' हंड्रेड डेज' हा नवी मालिका २४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.