'देवकी' (Devki Marathi Movie) मराठी चित्रपट २००१ साली रिलीज झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलिंद उके यांनी केले होते. हा चित्रपट सुहास शिरवळकर यांच्या देवकी या कादंबरीवर आधारित आहे. अलका कुबल, शिल्पा तुळसकर, सुधीर जोशी, मिलिंद गवळी, गिरीश ओक, अभिराम भडकमकर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. या दिग्गज कलाकारांसोबत विहंग भणगे (Vihang Bhange) आणि अनुराग वरळीकर (Anurag Worlikar) या दोन बालकलाकारांनीदेखील काम केले होते. देवकी चित्रपटाला प्रदर्शित होऊन आता २१ वर्षे लोटली आहेत. त्यामुळे आता या बालकलाकारांना ओळखणंदेखील कठीण झाले आहे.
विहंग भणगे हा बालकलाकार म्हणून मराठी हिंदी सिनेइंडस्ट्रीत चांगलाच लोकप्रिय ठरला आहे. वयाच्या अवघ्या दीड वर्षातच त्याने स्टेजवर पाऊल टाकले होते. विहंगचे बालपण डोंबिवलीमध्ये गेले. त्याचे वडील विवेक भणगे हे व्यवसायाने फोटोग्राफर आहेत. विहंगने राज्यनाट्य स्पर्धा, उठी उठी गोपाळा सारख्या नाटिकामधून बालकलाकार म्हणून काम केले. पुढे देवकी चित्रपटाने विहंगला मोठी लोकप्रियता मिळवून दिली. बालकलाकार म्हणून विहंगने १७ मराठी मालिका चित्रपट तसेच ४ हिंदी मालिका साकारल्या. ई टीव्ही मराठी वाहिनीवर ‘बालपण मोठ्यांचे’ हा कार्यक्रम सादर होत असे. या कार्यक्रमात विहंगने अनेक मोठमोठ्या कलाकारांच्या मुलाखती घेतल्या. मधल्या काळात शिक्षणासाठी अभिनय क्षेत्राला रामराम केला. डी जी रुपारेल कॉलेजमधून त्याने वाणिज्य शाखेची पदवी मिळवली.
बॉईज या चित्रपटातून त्याने मराठी सिनेइंडस्ट्रीत कमबॅक केले.चूक भूल द्यावी घ्यावी मालिकेत त्याने टेण्या गुरुजीचे पात्र साकारले. गुलमोहर, जय भवानी जय शिवाय या मालिकांमधून तो अभिनय क्षेत्रात सक्रिय झाला.
देवकी चित्रपटात विहंगसोबत अनुराग वरळीकर या बालकलाकाराने देखील महत्वाची भूमिका साकारली. देवकी हा अनुरागने अभिनित केलेला पहिला मराठी चित्रपट आहे. दे धमाल या मालिकेतही तो झळकला. पोर बाजार, मिशन चॅम्पियन, निवडुंग, बारायण, डॉ डॉन, वृत्ती या मालिका आणि चित्रपटात अनुरागने काम केले आहे. डॉ. डॉन या मालिकेत तो श्वेता शिंदेच्या मुलाची भूमिका साकारताना दिसला. अभिनय क्षेत्रासोबतच अनुरागने मास कम्युनिकेशनचे धडे गिरवले आहेत. यासोबतच त्याला दिग्दर्शन क्षेत्राची देखील विशेष आवड आहे.