Join us

'...त्यांना फक्त पैसे कमावायचेत'; अभिनेत्री अश्विनी महांगडे खासगी रुग्णालयाच्या 'ट्रिटमेंट'वर संतापल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2021 3:06 PM

'आई कुठे काय करते' मालिकेत अनघाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडेने खासगी हॉस्पिटलमधील ढिसाळ कारभारावर संताप व्यक्त केला आहे.

'आई कुठे काय करते' मालिकेत अनघाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडेच्या वडिलांचे कोरोनामुळे काही दिवसांपूर्वी निधन झाले. ही माहिती खुद्द तिनेच सोशल मीडियावर दिली होती. त्यानंतर आता तिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर तिला खासगी हॉस्पिटलमध्ये आलेल्या वाईट अनुभवाबद्दल संताप व्यक्त केला आहे. तसेच तिने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना तुम्ही खासगी हॉस्पिटलला कोरोना सेंटर म्हणून पत्र देता त्या हॉस्पिटलचा मृत्यू दर वाढतोय हे गृहितच धरता का, असा सवालही केलाय.

अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, वाई व पंचक्रोशील लोकांसाठी महत्वाचे...! पेशंट दगावला म्हणून तोडफोड करणे हा पेशा नाही आपला कारण वैद्यकीय सेवा देत असलेल्या प्रामाणिक लोकांचा आदर आहे. पण जे घडले आहे त्यावर व्यक्त व्हावे लागेल... या पोस्टमधून अश्विनीने तिचे वडील वाई येथील ज्या खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. तिथल्या ढिसाळ कारभाराबद्दल सांगितले आहे. तिने म्हटले की, माझ्या वडिलांना जाऊन १५ दिवस झाले. आम्ही पोरके झालो. आता व्यक्त व्हायला हवे कारण आमच्यासारखे आणखी कोणी पोरके होऊ नये हेच वाटतेय. तिने वडिलांना म्हणजेच नानांना वाई येथील बाबर रुग्णालयात आलेल्या संपूर्ण अनुभवाबद्दल सांगितले आहे. नाना उपचारासाठी दाखल झाल्यापासून त्यांच्यावर काय उपचार झाले यातले आम्हाला काहीच माहित नाही. ना आमच्यापैकी कोणीही नानांना आत जाऊन भेटले. हे डॉक्टर नेमका काय विचार करत आहे हे सांगण्यासाठी ते बांधील नाहीत का? म्हणजे फक्त बिल भरण्यासाठी नातेवाईक गरजेचे आहेत का?  पण आपण प्रश्न विचारला तर या डॉक्टरांचा इगो दुखतो की यांना काय अक्कल आहे की आम्हाला हे प्रश्न विचारतात. 

तिने पुढे आवाहनही केले की,  मी बाबर हॉस्पिटल आणि डॉक्टर बाबर दाम्पत्य यांच्यावर केस करणार नाही पण वाई आणि आजुबाजूच्या सर्व गावातील तमाम बंधू भगिनींना विनंती मात्र नक्की करेन की तुम्हाला माझ्यासारखे पोरके व्हायचे नसेल तर कृपया आपल्या नातेवाईकांना बाबर हॉस्पिटल वाईमध्ये उपचारासाठी पाठवू नका.

कारण सरकारी प्रोटोकॉल या दोन अक्षरांच्या हाताखाली हे लोक काय विचार करतात हे त्यांचे त्यांना सुद्धा माहित नसेल कदाचित आणि यांना फक्त पैसे कमवायचे आहेत. आजूबाजूला खाजगी हॉस्पिटल बद्दल हेच ऐकत आणि वाचत होते पण हे माझ्या आयुष्यात घडेल असे कधीच वाटले नाही.

इतकेच नाही तर तिने तिने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना तुम्ही खासगी हॉस्पिटलला कोरोना सेंटर म्हणून पत्र देता त्या हॉस्पिटलचा मृत्यू दर वाढतोय हे गृहितच धरता का, असा सवालही केला. ती म्हणाली की, मी अनुभवाशिवाय बोलत नाही पण जे माझ्या डोळ्यासमोर घडले ते महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी होत असणारच.

टॅग्स :अश्विनी महांगडेकोरोना वायरस बातम्याराजेश टोपे