छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच चर्चेत राहिलेल्या बिग बॉस या शोचं 17 वं पर्व नुकतंच संपलं आहे. मात्र, आजही त्यातील कलाकार सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत येतात. यात सध्या फिरोजा खान ऊर्फ खानजादी (khanzaadi) हिची चर्चा रंगली आहे. एका मुलाखतीमध्ये खानजादीने एक गौप्यस्फोट केला आहे. एका व्यक्तीने तिचं अपहरण करुन तिला नालासोपाऱ्यातील झोपडपट्टीत डांबून ठेवल्याचं तिने म्हटलं आहे.
खानजादीने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने मुंबईत पहिल्यांदाच आल्यानंतर तिच्यासोबत कोणता भयावह प्रकार घडला हे सांगितलं. सुरुवातीच्या काळात अनेकांनी फसवणूक केल्याचं तिने म्हटलं. इतकंच नाही तर तिचं अपहरणही करण्यात आलं होतं.
नेमकं काय घडलं खानजादीसोबत?
"मुंबईत आल्यानंतर आयुष्य बदलणार हे माहित होतं. इथे वाईट प्रवृत्तीची माणसं भेटतील हे आधीच मला अनेकांनी सांगितलं होतं. आणि, तसंच झाली अनेकांनी मला भडकवण्याचा, फसवण्याचा प्रयत्न केला. माझं अपहरण सुद्धा झालं. नालासोपारा येथील एका झोपडपट्टीत मला ते घेऊन गेले, मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पण, मी तिथून कसाबसा पळ काढला. याविषयी मी जास्त काही बोलणार नाही", असं खानजादी म्हणाली.
पुढे ती म्हणते, "माझ्यासोबत अनेक वाईट गोष्टी घडल्या. पण, मी जिद्द सोडली नाही. मी मुंबई सोडून जाणार नाही या एका गोष्टीवर मी ठाम होते. इथे पोहचण्यासाठी मी माझं कुटुंब, आनंद, भावना सगळ्याचा त्याग केला आहे. आणि, इथे आले आहे ते काही तरी करुन दाखवण्यासाठी. झगमगत्या विश्वात करिअर करण्यासाठी अनेक तरुणतरुणी घर सोडायचा निर्णय घेतात. पण, असं करु नका हेच मी त्यांना सांगेन. कारण, हा प्रवास सोपा नाही. प्रत्येत जण खानजादी किंवा कंगना रणौत नसतात."दरम्यान, खानजादीने इंडस्ट्रीतील कास्टिंक काऊचवरही भाष्य केलं. तिनेदेखील कास्टिंग काऊचचा सामना केल्याचं तिने म्हटलं आहे.