Join us  

निसर्गाचा आवाज अनुभवण्याची गोष्ट..!

By admin | Published: June 18, 2017 2:36 AM

काही चित्रपट नेहमीचा मळलेला मार्ग सोडून अनवट वाटेवरून चालताना दिसतात. निव्वळ करमणूकप्रधान असे लेबल न लावता या चित्रपटांकडे थोड्या वेगळ्या

- राज चिंचणकरमराठी चित्रपट- माचीवरला बुधा काही चित्रपट नेहमीचा मळलेला मार्ग सोडून अनवट वाटेवरून चालताना दिसतात. निव्वळ करमणूकप्रधान असे लेबल न लावता या चित्रपटांकडे थोड्या वेगळ्या दृष्टीनेच पाहावे लागते. चित्रपट म्हणून ‘माचीवरला बुधा’ ही अशीच चाकोरीबाहेरची कलाकृती आहे. पण असे असले, तरी आर्ट फिल्मच्या पठडीत मोडणारा हा चित्रपट नाही. मग या चित्रपटात नक्की आहे तरी काय, हे शोधण्यासाठी निसर्गात रमलेल्या माचीवरच्या या बुधाला प्रत्यक्ष भेटणे क्रमप्राप्त ठरते. कारण हा चित्रपट म्हणजे केवळ पाहणे आणि ऐकणे याच्यापलीकडे जाऊन अनुभवण्याची गोष्ट आहे.शहरी जीवनाला मागे सोडून या गोष्टीतला बुधा हा माणूस राजमाचीच्या जंगलात येऊन वास्तव्य करतो आणि थेट निसर्गाचाच एक भाग बनून जातो. पशू-पक्षी त्याचे सोबती होतात आणि वृक्षवल्ली त्याचे सगेसोयरे बनतात. एक झोपडी बांधून बुधा या जंगलात राहू लागतो. त्याच्या जोडीला असलेला टिप्या हा कुत्रा त्याच्या जीवाभावाचा सखा बनतो. झोपडीला सावली देणारा झाडोबा हा वृक्ष, बुधाने अंगणात लावलेले आवळीबाईचे रोपटे, झोपडीत खेळणाऱ्या खारूतार्इंची जोडी आदींच्या संगतीत बुधा निसर्गाशी पार एकरूप होऊन जातो. एकदा त्याचा मुलगा त्याला शहरात न्यायला येतो खरा; परंतु निसर्गात विरघळून गेलेल्या बुधाचा पाय जंगलातून काही केल्या निघत नाही. ज्येष्ठ कादंबरीकार गो.नी. दांडेकर यांच्या ‘माचीवरला बुधा’ या कादंबरीवरून या चित्रपटाची गोष्ट गुंफली आहे. बावनकशी सोने असलेल्या या मूळ कादंबरीवर प्रताप गंगावणे यांनी पटकथा व संवाद लिहिले आहेत. कादंबरीच्या आशयाला फार बाधा येऊ न देता त्यांनी केलेली कामगिरी स्तुत्य म्हणावी लागेल. वृक्ष, प्राणी आणि पक्ष्यांशी यातला बुधा संवाद साधत असला, तरी ती त्याची आत्ममग्नता आहे. त्याचे हे स्वत:शीच संवाद साधणे संवेदनशील मनाला नक्कीच भावते. दिग्दर्शक विजयदत्त यांनी गोनीदांच्या कादंबरीचे माध्यमांतर करत तिला दृश्य परिणाम दिले आहे. त्यांना असलेली निसर्गदृष्टी चित्रपटात दिसते; अन्यथा या गोष्टीतल्या निसर्गाशी संवाद जुळवणे ही तशी अवघड प्रक्रि या होती. यातल्या बुधासोबत निसर्गसुद्धा महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे, याची जाण ठेवलेली दिसते. या गोष्टीत इतर दोन-चार व्यक्तिरेखा येऊन-जाऊन असल्या, तरी अधिकाधिक चित्रपट एकट्या बुधाचा आहे आणि त्याचे योग्य ते व्यवधान राखत त्यांनी हा सगळा पट मांडला आहे. यातल्या बुधाच्या मुलाच्या व्यक्तिरेखेने पकडलेला थोडासा विनोदी बाज मात्र टाळायला हवा होता. बुधाची व्यक्तिरेखा ठसवण्याचा भाग म्हणून यात एकट्या कलाकाराच्या खांद्यावर असलेली जबाबदारी लक्षात घेता, त्याच्या एकूणच मांडणीला मर्यादा येतात हे स्पष्टच आहे. चित्रपट कादंबरीवर बेतला असला, तरी त्याची स्वतंत्र कलाकृती म्हणूनच दखल घेणे भाग आहे आणि त्यादृष्टीने हा सगळा प्रयत्न मात्र जमून आला आहे.निसर्गच एक व्यक्तिरेखा बनून या चित्रपटातून समोर येत असल्याने, चित्रपटाचे छायाचित्रण करणाऱ्या अनिकेत खंडागळे व योगेश कोळी यांची जबाबदारी मोठी होती आणि चित्रपटभर फिरलेला त्यांचा कॅमेरा पाहून त्यांनी ती चांगल्या प्रकारे पेलल्याचे दिसते. संकलक अनिल गांधी, कला दिग्दर्शक नितीन बोरकर व संगीतकार धनंजय धुमाळ यांची कामगिरीही उजवी आहे. पार्श्वसंगीत हा या चित्रपटाचा आत्मा असल्याचे अचूक भान राखत विजय गवंडे यांनी केलेले काम दखल घेण्याजोगे आहे. केवळ पक्ष्यांच्या कूजनातून निर्माण झालेले यातले गाणे हे या चित्रपटाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे.गोनीदांच्या कादंबरीतला बुधा पडद्यावर उतरवणे हे खरे तर मोठे आव्हान होते; मात्र सुहास पळशीकर यांनी ते लीलया स्वीकारल्याचे दिसते. कादंबरीतला बुधा त्यांनी नेटकेपणाने चित्रपटात रंगवला आहे. किंबहुना, त्यांची ही भूमिका पाहताना त्यांना बुधा अचूक सापडला असल्याचे स्पष्ट होत राहते. स्मिता गोंदकरने यात फुला ही युवती साकारताना चाकोरीबाहेरची भूमिका रंगवली आहे. भगवान पाचोरे, नितीन कुलकर्णी, कृष्णा दत्त आदी कलावंतांची साथ ठीक आहे. निसर्गाबद्दल बरेच काही सांगू पाहणारा आणि निसर्गाची ओढ लावणारा हा चित्रपट, त्यातले निसर्गायण समजून घेऊन पाहिल्यास निश्चितच वेगळी अनुभूती देऊन जाणारा आहे.ज्येष्ठ कादंबरीकार गो.नी. दांडेकर यांच्या ‘माचीवरला बुधा’ या कादंबरीवरून या चित्रपटाची गोष्ट गुंफली आहे. बावनकशी सोने असलेल्या या मूळ कादंबरीवर प्रताप गंगावणे यांनी पटकथा व संवाद लिहिले आहेत. कादंबरीच्या आशयाला फार बाधा येऊ न देता त्यांनी केलेली कामगिरी स्तुत्य म्हणावी लागेल.