Join us

मराठमोळ्या अभिनेत्री सुप्रिया पाठारे एकेकाळी लोकांची भांडी घासायच्या; रस्त्यावर अंडी, चणे विकायच्या..!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2021 1:51 PM

Supriya Pathare Interview : मराठमोळ्या अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी आजवर अनेक भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. अर्थात इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता...

विनोदी म्हणा, नकारात्मक म्हणा, गंभीर म्हणा अशा वेगवेगळ्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुप्रिया पाठारे (Supriya Pathare) यांची नव्यानं ओळख करून देण्याची गरज नाही. हसऱ्या आणि बोलक्या चेहऱ्याच्या सुप्रिया सध्या त्या ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत पाहायला मिळत आहेत. अर्थात इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. चार भावंडात सगळ्यात थोरल्या असल्याने सुप्रियांनी कधीकाळी चक्क लोकांच्या घरची भांडी घासली.‘सीएनएक्स फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया यांनी हा स्ट्रगल सांगितला.लोकप्रिय अभिनेत्री अर्चना नेवरेकर ही सुप्रिया यांची धाकटी बहिण. अर्चना नाटकांत काम करायच्या. पण सुप्रियांच्या मनात कधीच अभिनयात यायचा विचारही आला नव्हता. मात्र अर्चना यांच्यासोबत ‘बॉडीगार्ड’ म्हणून सुप्रिया सेटवर जायला लागल्या आणि इथून त्यांना अभिनयाची गोडी लागली.त्याआधी मात्र सुप्रिया यांनी रस्त्यावर अंडी, चणी विकलीत, कधी दुधाच्या बाटल्या घरोघरी पोहोचवायचं काम केलं. घरची परिस्थिती बेताची होती. चारही भावंडात मोठ्या असल्यानं सुप्रियावर घराची मोठी जबाबदारी होती.

डान्स क्लासची फी भरायला भांडी घासली...

मला नृत्याची फार आवड होती. मला भरतनाट्यम डान्स क्लास लावायचाय, असं मी आईला सांगितलं. फी होती 70 रूपये. पण आईला ती परवडणारी नव्हती.अखेर अर्चना पालेकर यांच्याकडे भरतनाट्यम शिकण्यासाठी मी त्यांच्या मैत्रिणीकडे भांडी घासायचं काम सुरू केलं. त्याचे मला 100 रुपये मिळायचे. क्लासचे 70 रुपये भरून उरलेले 30 रुपये मी आईला द्यायचे.मी आणि माझी आई तेव्हा 18 घरांची भांडी घासायच्या.  18 घरची भांडी घासून मी थकून जायची. इतकी की डान्स क्लासला गेल्यावर एनर्जीचं पुरायची नाही. म्हणून तो डान्स क्लास मी फार काही गंभीरपणे केला नाही. पण डान्स शिकण्याची इच्छा मी नक्की पूर्ण करेल.  किती जमेल माहित नाही. पण मी ही इ्च्छा नक्की पूर्ण करेल, असे सुप्रिया म्हणाल्या.

रस्त्यावर चणे,अंडी विकली...घरात खाणारी बरीच तोंड होती आणि परिस्थिती बेताची. अशावेळी मी घरोघरी जाऊन दूधाच्या बाटल्या पोहोचवल्यात. दुपारची शाळा असायची. त्याआधी मी घरोघरी दूधाच्या बाटल्या पोहोचवायची. पण त्यातूनही फार काही मिळायचं नाही. मग मी रस्त्यावर अंडी आणि चणे विकणं सुरू केलं. एकदा माझ्या शाळेच्या शिक्षिकेने मला रस्त्यावर अंडी व चणे विकताना पाहिलं. मुलगी आता मोठी होतेय, रस्त्यावर अंडी विकणं चांगलं दिसतं नाही, असं त्या माझ्या आईला म्हणाल्या. इतकंच नाही तर आजपासून सुप्रिया माझी..., असं म्हणून शाळेच्या त्या बाईनी मला  दत्तक घेतलं, असं त्या म्हणाल्या.

टीव्हीवर झळकेल असं कधीच वाटलं नव्हतं...टीव्हीवर येईल असं कधीच वाटलं नव्हतं. मी पैशांसाठी खूप काम केलीत. घरकाम, शाळाही होतीच. मी अभिनयात यायचा कधीच विचार केला नव्हता. माझी बहिण अर्चना आणि माझ्या एका मैत्रिणीमुळे मी अभिनयक्षेत्रात आले. माहेरच्यांनी मला पाठींबा दिला आणि लग्नानंतर पाठारे कुटुंबीयांनीही मला प्रोत्साहन दिले. माझ्या यशात जितका वाटा माहेरच्यांचा आहे, तेवढाच सासरच्यांचाही आहे. अजूनही मला खूप काही करायचं आहे आणि माझा प्रवास असाच सुरू राहिलं,असंही त्या म्हणाल्या. 

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजन