'हायवे मॅन' केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आयुष्य जनतेला रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. देशाच्या विकासासाठी कायमच कटिबद्ध असणाऱ्या नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘गडकरी’मध्ये नितीन गडकरींच्या भूमिकेत कोण पाहायला मिळेल, यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. तर अखेर याचा खुलासा झाला आहे.
गडकरी चित्रपटाचे दुसरे पोस्टर झळकले असून यातील 'गडकरी' यांचा चेहरा समोर आला आहे. अभिनेता राहुल चोपडा यांनी नितीन गडकरी यांची आव्हानात्मक भुमिका साकारली आहे. तर त्यांच्या पत्नीची म्हणजेच कांचन गडकरी यांची भूमिका ऐश्वर्या डोरले साकारणार आहे.
'गडकरी' या चित्रपटातून गडकरींच्या राजकीय प्रवास मोठ्या पडद्यावर मांडण्यात येणार आहे. राजकारणाशिवाय, त्यांचे वैयक्तिक आयुष्य व तरुण काळ तितकाच रंजक आहे. अशा या नेत्याचा जीवनप्रवास प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. हा चित्रपट येत्या २७ ऑक्टोबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक अनंत भुसारी यांनी गडकरींच्या या बायोपिकचं दिग्दर्शन केलं आहे. तर अक्षय देशमुख यांनी निर्मिती केली आहे.
सक्षम आणि कार्यतत्पर नेतृत्त्व, सडेतोड भूमिका, नव्या भारतासाठी दूरदृष्टी ठेवून धडाकेबाज निर्णय घेणारे राजकारणी नेते अशी भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ओळख आहे. त्यांच्या आयुष्यावरील या चित्रपटाबाबत प्रेक्षकांना उत्सुकता आहे. काही दिवसांपुर्वीच या चित्रपटाचा टीझरही समोर आला होता. आता चाहते सिनेमाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत.