मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असते. कधी ग्लॅमरस फोटोंमुळे तर कधी आगामी प्रोजेक्टमुळे. सध्या ती खूपच चर्चेत आली आहे. लवकरच ती चंद्रमुखी (Chandramukhi Movie) या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिने साकारलेल्या चंद्राची सर्वत्र बोलबोला पाहायला मिळतो आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी पाहून प्रेक्षक चित्रपटाच्या रिलीजची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. दरम्यान आता अमृता खानविलकर हिने एका मुलाखतीत चंद्रमुखी चित्रपटातील तिच्या प्रवासाबद्दल सांगितले आहे.
अमृता खानविलकरने फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत चंद्रमुखी चित्रपटातील प्रवासाबद्दल सांगितले. ती म्हणाली की, या चित्रपटाच्या प्रवासाची सुरूवात दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी मला कादंबरी वाचायला दिल्यापासून झाली. मला अजूनही आठवतंय की आम्ही एकत्र चित्रपट सुरू करत आहोत, म्हणून मी दिवाळीच्या वेळी प्रसादला चेक दिला होता. पुढे काय घडणार हे माहित नव्हते. कारण त्यावेळी चित्रपटासाठी निर्माता नव्हता. तसेच माझ्याकडे त्याचे अधिकारही नव्हते.
ती पुढे म्हणाली की, वेल डन बेबी या माझ्या चित्रपटासाठी मी लंडनला गेले होते. मी तिथे अक्षय बर्दापूरकरला भेटले आणि मी त्यांना सांगितले की, आपण काय करत आहोत. त्यांना ही कल्पना आवडली आणि भारतात परत आल्यानंतर प्रसाद, अक्षय आणि माझी भेट झाली. त्यानंतर आम्ही लेखक विश्वास पाटील यांच्याकडे गेलो आणि त्यांच्या कादंबरीचे हक्क मिळवले. आम्ही अजय-अतुल यांनाही यात सहभागी होण्यासाठी सांगितले आणि त्यांनी ते मान्य केले. पण नंतर लॉकडाऊन झाले आणि सर्व काही ठप्प झाले. पण त्यामुळे लेखक, संगीत दिग्दर्शक, प्रसाद आणि मला चित्रपटात काम करण्यासाठी अधिक वेळ मिळाला. लावणीचे कोरिओग्राफर आशिष पाटील यांच्यासोबत आम्ही भाषा आणि डिक्शन वर्कशॉप्सच्या सुमारे आठ महिन्यांच्या कार्यशाळा घेतल्या. दुसऱ्या लॉकडाउनपूर्वी चार महिन्यांचे अंतर असताना आम्ही ४५ ते ४८ दिवसांत चित्रपट शूट केला.