मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा लता दीनानाथ मंगेशकर (Lata Deenanath Mangeshkar Award) हा मानाचा पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांना प्रदान करण्यात आला आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर लता दीदींच्या आठवणीत आशा भोसले भावुक झालेल्या दिसून आल्या. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुंबईतल्या षण्मुखानंद हॉलमध्ये 'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार सोहळा पार पडला. लता मंगेशकर यांच्या नावाने देण्यात आलेल्या मानाच्या पुरस्काराचे यंदाचे दुसरे वर्ष आहे.
यावेळी आशा भोसले म्हणाल्या की, आजचा हा क्षण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मला देण्यात आलेला हा पुरस्कार आज जर लतादीदींच्या हस्ते मिळाला असता तर मला अत्यानंद झाला असता. हा पुरस्कार माझ्यासाठी खूप मोठा आहे.
याच सोहळ्यात भारतीय संगीतातल्या योगदानासाठी पंकज उधास यांना, तर अभिनयक्षेत्रातल्या योगदानासाठी विद्या बालन आणि प्रसाद ओक यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्वोत्तम मराठी नाटकासाठीचा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 'नियम व अटी लागू' या नाटकाला देण्यात आला. पंडित हृदयनाथ मंगेशकर हे 'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. 'लता दीनानाथ मंगेशकर' या पुरस्काराआधी आशा भोसले यांना राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्र भूषण या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
दरवर्षी दीनानाथ स्मृति प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायक, साहित्यिक, कलाकार, सेवाभावी संस्था आदींना मास्टर दीनानाथजींच्या स्मृतिप्रित्यर्थ पारितोषिके प्रदान केली जातात. गेल्या 33 वर्षांपासून नोंदणीकृत सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट, मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, व्यावसायिक आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जात आहे.