मुंबई - राज्यात विविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी आणि सत्ताधारी शिंदे-भाजप सरकार यांच्यातील आरोप-प्रत्यारोप तीव्र होताना दिसत आहेत. त्यातच शिवसेना नेते संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्याने ठाकरे गटात आनंदाचे वातावरण आहे. तर, दुसरीकडे ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटांना विरोध वाढताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस याबाबत आक्रमक झाली असून, राज्यातील काही ठिकाणी ‘हर हर महादेव’ चित्रपटाचे शो बंद पाडण्यात आले. याप्रकरणी आता अभिनेते शरद पोंक्षे यांनी आपली भूमिका मांडताना आव्हाड यांनाही लक्ष्य केलं.
जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये जाऊन शो बंद पाडला. त्यावरून आता राष्ट्रवादीवर टीका करण्यात येत आहे. ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या वादात बाबासाहेब पुरंदरे यांना का ओढता आहात? बाबासाहेब पुरंदरे यांनी या सिनेमाची कथा लिहिली आहे का? अशी विचारणा करण्यात आली. ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांनी आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसवर पलटवार केला. या सिनेमाला सर्वात प्रथम विरोध आम्ही केला, असा दावाही आनंद दवे यांनी केला. तर, दुसरीकडे अभिनेते शरद पोंक्षे यांनीही आव्हाड यांना लक्ष्य केलं. तसेच, चित्रपटाला विरोध करणे हा मूर्खपणा असून सिनेमात कुठेही इतिहासाची मोडतोड करण्यात आली नसल्याचं ते म्हणाले.
पंढरपूर येथे हिंदू महासभेच्या वतीने शरद पोंक्षे याना क्रांतिवीर वसंत दादा बडवे हिंदूत्व शॉर्या पुरस्कार प्रदान करण्यात आला, यावेळी पोंक्षे बोलत होते. 'हा मुर्खपणा आहे. सिनेमा सेन्सॉर झाला आहे. मी त्या चित्रपटात काम केलं आहे. सेन्सॉरला आमच्या दिग्दर्शकांनी पुरावे दिले आहेत. चित्रपटात इतिहासाची कोणतीही मोडतोड झालेली नसून याबाबत आक्षेप घेणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना चित्रपटाचे दिग्दर्शक भेटणार आहेत.
सत्ता गेल्यामुळेच पब्लिसीटीसाठी स्टंट
चित्रपट रिलीज होऊन दोन आठवडे झाल्यानंतर हे लोकांना सुचतं का? सत्ता गेलेली आहे म्हणून पब्लिसिटीसाठी हे सगळं लोक करत आहेत. चित्रपटात काहीही मोडतोड करण्यात आलेली नाही. अभिजित देशपांडे यांनी अभ्यास करुन चित्रपटाची स्क्रिप्ट केली आहे.'सिनेमा चालू असतात लोकांना मारणं हा हलकटपणा आहे. तुम्ही गुंड आहात का? या लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तर सिनेमा बघणाऱ्यांना नाही का? ' असंही यावेळी शरद पोंक्षे यांनी सांगितलं.