थॉर या हॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असलेला अभिनेता इस्साक कॅपीने नुकतीच आत्महत्या केली. तो ४२ वर्षांचा होता. अॅरिझोना डिपार्टमेंट ऑफ पब्लिक सेफटीने त्याच्या आत्महत्येची पुष्टी केली आहे.
usatoday.com या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, एरिझोना येथील फ्लॅगस्टाफ जवळील हायवेवरील ब्रीजवरून उडी मारून इस्साक कॅपीने आपले आयुष्य संपवले. इस्साक कॅपीने अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. २०११ साली प्रदर्शित झालेल्या थॉर या चित्रपटातील त्याने साकारलेली स्टोर क्लर्कची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. २००९ च्या टर्मिनेटर सॅलव्हेशन या चित्रपटात त्याने बारबासोसा ही भूमिका साकारली होती तर त्याच साली प्रदर्शित झालेल्या फॅनबॉईज या चित्रपटात देखील त्याने काम केले होते.
इस्साक कॅपी हा प्रसिद्ध मोन्सटर पॉझ बँडचा देखील सदस्य होता. कॅपीने त्याच्या मृत्युपूर्वी तीन दिवस आधी इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर एक पोस्ट केली होती. ज्या माणसाकडे काहीही सांभाळण्यासारखे नसते, अथवा काहीही हरवण्यासारखे नसते अशा लोकांपासून सावध राहा अशी कॅप्शन देऊन त्याने एक भली मोठी नोट लिहिली होती. त्यात त्याने म्हटले होते की, मी माझ्या आयुष्यात कसा होता याची जाणीव मला झाली आहे. मी एक खूप चांगला व्यक्ती आहे असे मी मानत होतो. पण मी चांगला नाहीये. मी आयुष्यभर खूपच वाईट होतो. मी लोकांचा वापर केवळ पैशांसाठी केला आहे. मी खूप लोकांना दुखावले असून त्यांचा विश्वास तोडला आहे. मी ड्रग्सची विक्री केली आहे. मी अनेकांकडून कर्ज घेतली आहे. दारू, सिगारेट आणि ड्रग्समुळे मी माझ्या शरीराची वाताहत केली आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या, माझ्या कुटुंबातील लोकांशी मी वाईट वागलो आहे. मी स्वतःला मदत न करता दुसऱ्यांनी मला मदत करावी याची अपेक्षा करत होतो. मी जुगारात मोठ्या प्रमाणावर पैसा हरलो आहे. मी गेल्या आठवड्यात काही गोष्टी चुकीच्या केल्या आणि त्याची मी आता किंमत मोजत आहे. या गोष्टी काय होत्या हे मी लवकरच सांगेन. माझ्यात खूप चांगली कला होती. पण त्याचा मी योग्यप्रकारे वापर केला नाही. देवा... मला माफ कर मी चुकीचा वागलो आहे.