कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. लोकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, मास्कचा वापर करावा असे सरकार सांगत आहे. पण तरीही कोरोनाचे नियम पायदळी तुडवले जात आहेत. नुकताच एका गर्दीचा व्हिडिओ पोस्ट करत प्रकाश राजने आपला संताप सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला आहे.
सोशल डिस्टन्सिंगचे नियम कडक करण्यात आलेले असताना सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात अनेक महिला कोरोनाचे नियम पायदळी तुडवत करोना काळात पूजेसाठी एकत्र आलेल्या पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ गुजरातमधील आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत प्रकाश राजने लिहिले आहे की, गो करोना गो... आपण कधीच शिकणार नाही आहोत का? मी फक्त विचारत आहे.
प्रकाश राजच्या या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. डोक्यावर पाण्याचा कलश घेऊन अनेक महिला पूजेसाठी जात असल्याचे या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. कोरोना यांच्यासाठी नसतो का, अशाच लोकांमुळे कोरोनाचा प्रसार अधिक होतो अशा भावना नेटिझन्स सोशल मीडियाद्वारे व्यक्त करत आहेत.
गुजरातमधील या प्रकरणावर पोलिसांनी कारवाई केली असून अहमदाबाद ग्रामीण भागाचे डीएसपी के. टी. खेमरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी २३ लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. ज्यात गावाच्या सरपंचांचाही समावेश आहे.