२०२३मध्ये अनेक मोठे आणि सुपरहिट सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. अनेक सिनेमांनी बॉक्स ऑफिस गाजवलं. तर काही सिनेमे प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले. अशाच सिनेमांपैकी एक म्हणजे 'थ्री ऑफ अस'(Three Of Us). नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. शेफाली शाह, स्वानंद किरकिरे आणि जयदीप अहलावत मुख्य भूमिकेत असलेला 'थ्री ऑफ अस'(Three Of Us) बॉक्स ऑफिसवर फारसा गाजला नाही. पण, या सिनेमाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
'थ्री ऑफ अस'(Three Of Us) या सिनेमाची कथा शैलजा, दीपांकर आणि प्रदीप कामथ या तीन पात्रांभोवती फिरते. या सिनेमात शेफाली शाहने शैलजा, स्वानंद किरकिरे यांनी दीपांकर तर जयदीप अहलावतने प्रदीप कामथ हे पात्र साकारलं आहे. सिनेमाच्या सुरुवातीलाच शैलजा या पात्राला विस्मृती होत असल्याचं दाखविण्यात आलं आहे. आयुष्यातील सगळ्या आठवणी विस्मरणात जाण्याआधी शैलजाला तिचं बालपण गेलं त्या ठिकाणी म्हणजेच कोकणातील वेंगुर्लेला जायचं असतं. तिची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी शैलजाचा पती दीपांकरही तिच्याबरोबर जातो. वेंगुर्ल्याला जाऊन शैलजा तिचा बालपणीचा मित्र प्रदीप कामथला शोधते. त्यानंतर शैलजा आणि प्रदीप त्यांच्या खास आठवणी असलेल्या जागांना भेटी देत त्या पुन्हा अनुभवतात. त्यांच्या या प्रवासात शैलजाचा पती दीपांकरही त्यांची साथ देतो. पण, शैलजा ज्या गोष्टीचा शोध घेण्यासाठी कोकणात आली आहे, ती गोष्ट तिला सापडते का? तिघांच्या अनोख्या प्रवासाची गोष्ट सांगणारा 'थ्री ऑफ अस'(Three Of Us) हा सिनेमा पाच कारणांसाठी पाहायला हवा.
कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय : 'थ्री ऑफ अस'(Three Of Us) या सिनेमातील शेफाली शाहने साकारलेल्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. या सिनेमात तिने साकारलेलं शैलजा देसाई हे पात्र प्रेक्षकांना आपलंसं वाटतं. याबरोबरच स्वानंद किरकिरे आणि जयदीप अहलावत यांनी उत्कृष्टरित्या त्यांच्या भूमिका साकारल्या आहेत.
सिनेमॅटोग्राफी : अविनाश अरुण यांनी या सिनेमाचं चित्रण केलं आहे. दिग्दर्शकच सिनेमॅटोग्राफर असल्याने त्याच्या दृष्टीतील सिनेमा उत्कृष्टरित्या फ्रेम्समधून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला आहे. चित्रपटाचा बहुतांश भागाचं शूटिंग कोकणात करण्यात आलं आहे. त्याबरोबरच सिनेमातील सीन शूट करताना नैसर्गिक लाइट्सचा केलेला वापर सिनेमाला चार चांद लावतो.
संवाद आणि लेखन : 'थ्री ऑफ अस'(Three Of Us) या सिनेमाचं लेखन अविनाश अरुण, ओमकार अच्युत बर्वे आणि अर्पिता चॅटर्जी यांनी केलं आहे. तर शोएब झुल्फी आणि वरुण ग्रोव्हर यांनी संवादलेखन केलं आहे. नात्यांबद्दलचं बारीक निरिक्षण आणि त्याबाबत लिहिलेले सहजसुंदर संवाद ही या सिनेमाची जमेची बाजू आहे.
कथा : या सिनेमाचं यश हे कलाकारांचा अभिनय आणि दिग्दर्शकाचं आहे. कठीण प्रसंगातही अत्यंत सहजरित्या आणि संयमाने हाताळताना दाखवले गेले आहेत. त्यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांना रिलेट करतो.
बाकीच्या गोष्टींबरोबरच 'थ्री ऑफ अस'(Three Of Us) सिनेमातून माणसांच्या भावनांचं उत्कृष्टरित्या दर्शन घडविण्यात आलं आहे. त्यामुळे हा सिनेमा तुमच्या काळजाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही.