एका गावात सात वर्षात सात आत्महत्या होतात. आणि ह्या सगळ्या आत्महत्या श्रावण महिन्यातच होतात. विशेष म्हणजे त्यातल्या प्रत्येक आत्महत्येचा एक साक्षीदार आहे. ह्या प्रत्येकानेच कोणाला तरी पाहिलंय. कोणाला?. सावट कथेचा चित्तथरारक टिझर सोशल मीडियावर लाँच झाला आहे. त्यातून स्पष्ट होतंय की, हा थरारक सिनेमा पाहताना एक प्रकाराची रक्त गोठवणारी भीती नसानसातून सळसळणार आहे.
हितेशा देशपांडे आणि शोभिता मांगलिक निर्मित आणि सौरभ सिन्हा दिग्दर्शित सावट चित्रपटाचा पहिला टिझर पाहून कोणाच्याही मनात प्रश्नांचे डोंगर उभे राहतील. टिझरमध्ये दर्शवलेल्या संदेशावरून नक्कीच ह्यात गूढ, थरारक आणि रंजक कथानकाचा अंदाज येतो.याविषयी 'सावट'ची निर्माती हितेशा देशपांडे म्हणते, “मराठीत एक म्हण आहे, जसे दिसते तसे नसते म्हणून जग फसते. तसेच काहीसे सावट सिनेमाबाबतही आहे.. सत्य-असत्याच्या रेषेवरचे अनेक प्रश्न असतात. त्या प्रश्नांचे सावटचे बऱ्याचदा माणसाच्या मनावर असते. आणि मग तो उगीच घाबरून श्रद्धा-अंधश्रद्धेच्या कचाट्यात सापडतो.दिग्दर्शक सौरभ सिन्हा म्हणतात, “हा चित्रपट थरारनाट्य आहे. एका गावात काही समजुती आणि गैरसमजुतींचे सावट लोकांच्या मनावर असताना, चित्रपटात आत्महत्यांचे सत्र चालू होते. चित्रपट गुढ कथेवर आहे. ह्यातली प्रत्येक पात्र तुम्हांला खिळवून ठेवतील, असा मला विश्वास आहे.”
निरक्ष फिल्मच्या सहयोगाने लेटरल वर्क्स प्रा.लि.प्रस्तुत, हितेशा देशपांडे आणि शोभिता मांगलिक निर्मित, सौरभ सिन्हा दिग्दर्शित 'सावट' चित्रपटात स्मिता तांबे, मिलिंद शिरोळे, श्वेतांबरी घुटे आणि संजीवनी जाधव मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २२ मार्च २०१९ ला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.