मराठी साहित्य विश्वातील अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे पु. ल. देशपांडे. महाराष्ट्रातील लाडके व्यक्तिमत्व पु.ल.देशपांडे यांच्याविषयी आजही प्रत्येक मराठी माणसाच्या मनात एक विशेष स्थान आहे. आपल्या साहित्य व नाटकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे पु.ल. देशपांडे यांचे व्यक्तिमत्व काही निराळेच होते. ८ नोव्हेंबर ही पु. ल. यांची जयंती. आजपासून देशभरात पु. ल. देशपांडे यांच्या शतकीजन्मोत्सवाला सुरुवात झाली आहे. या निमित्ताने संगीतकार कौशल इनामदारने पु.लंसोबतचा फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.कौशल इनामदारने त्यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून लिहिले की,संगीत क्षेत्रात स्वत:चे अस्तित्व निर्माण करत असताना माझे गाणे पु.ल.देशपांडे यांनी ऐकले आणि चक्क मला भेटण्यासाठी बोलावून घेतले. पु.ल. देशपांडेंचे असे अचानकपणे मला बोलावणे ही माझ्यासाठी आनंदाची आणि तितकीच आश्चर्यचकित करणारी बाब होती. परंतु ही भेट माझ्या कायम स्मरणात राहिली. मरणापूर्वी आपली प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावेत अशी साऱ्यांची इच्छा असते. तशी माझीही पुलंना भेटण्याची इच्छा होती आणि ही इच्छा माझी अपोआप पूर्ण झाली. माझी केवळ एक-दोन गाणी ऐकल्यानंतर त्यांनी मला भेटीसाठी बोलावणे ही माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट होती.
अशाप्रकारे कौशल इनामदारची पु.ल. देशपांडे यांना भेटण्याची इच्छा पूर्ण झाली.