बूम हा चित्रपट 2003 मध्ये प्रदर्शित झाला होता. कैजाद गुस्ताद यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अमिताभ बच्चन, गुलशन ग्रोव्हर, जॅकी श्रॉफ, जीनत अमान, जावेद जाफरी यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाद्वारे कतरिना कैफने तिच्या करियरला सुरुवात केली होती. हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्याआधीच ऑनलाईन लीक झाला होता. याचाच फटका या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर झाला होता.
बुम या चित्रपटाची निर्मिती जॅकी श्रॉफची पत्नी आयशा श्रॉफच्या बॅनर अंतर्गत करण्यात आली होती. या चित्रपटाच्या अपयशामुळे जॅकी श्रॉफच्या कुटुंबियाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती असे टायगर श्रॉफने एका मुलाखतीत सांगितले होते.
टायगर श्रॉफने एका मुलाखतीत सांगितले होते की, बूम हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट झाली होती. त्यावेळेची परिस्थिती आठवली की, आजही अंगावर काटा येतो. आमच्याकडे पैशांची चणचण असल्याने आम्हाला घरातील फर्निचर देखील विकावे लागले होते. बूम या चित्रपटाच्या अपयशामुळे माझ्या घरातील एक एक गोष्टी विकल्या गेल्या होत्या. आमच्यासाठी प्रिय असलेल्या अनेक गोष्टी विकण्याशिवाय आमच्याकडे पर्यायच नव्हता. माझा बेड देखील विकला गेला होता. त्यामुळे मी जमिनीवर झोपायचो. मी लहानाचा मोठा होईपर्यंत ज्या वस्तू मी घरात माझ्या डोळ्यांसमोर पाहिल्या होत्या. त्या वस्तू एक एक करून घरातून जात होत्या. हा काळ आमच्या आयुष्यातील सगळ्यात वाईट काळ होता असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. त्यावेळी मी केवळ 11 वर्षांचा होतो. घरात काय सुरू आहे हे कळण्याचे देखील माझे ते वय नव्हते.