'सातव्या मुलीची सातवी गोष्ट' मालिकेतील नेत्रा म्हणजेच अभिनेत्री तितीक्षा तावडे. काही दिवसांपूर्वीच तितीक्षाने लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली. तितीक्षाने अभिनेता सिद्धार्थ बोडकेशी कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत सात फेरे घेतले. लग्नानंतर तितीक्षाने सिद्धार्थबरोबर तिचा पहिला गुढीपाडव्याचा सण साजरा केला. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
गुडीपाडवा सेलिब्रेट करण्यासाठी तितीक्षाने मालिकेतून छोटाशा ब्रेक घेतला होता. तिच्या सासरी नाशिक येथे पती सिद्धार्थ आणि सासू सासऱ्यांबरोबर तिने लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा साजरा केला. गुढीपाडव्यासाठी तितीक्षाने खास हिरव्या रंगाची साडी नेसली होती. हातात हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र घालत तितीक्षा नववधूसारखी नटली होती. तर सिद्धार्थने पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. घराबाहेर गुढी उभारत तितीक्षा आणि सिद्धार्थने लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा साजरा केला. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिचे सासू सासरेही दिसत आहेत.
"गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...सगळयांना नवीन वर्ष आंनदाचे, समृध्दीचे आणि उत्तम आरोग्याचे जावो", असं कॅप्शन तितीक्षाने या फोटोंना दिलं आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
सिद्धार्थ आणि तितीक्षाने २६ फेब्रुवारीला लग्नाच्या बेडीत अडकत नवीन आयुष्याला सुरुवात केली. सिद्धार्थदेखील लोकप्रिय अभिनेता आहे. सिद्धार्थ आणि तितीक्षाने 'तू अशी जवळी राहा' मालिकेत एकत्र काम केलं होतं. सिद्धार्थ 'JNU' या बॉलिवूड सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तो मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.