Join us  

सेन्सॉरविरोधात ‘टिवटिव’!

By admin | Published: June 09, 2016 2:46 AM

पंजाब राज्याची प्रतिमा मलीन होत असल्याचे कारण देत, सेन्सॉर बोर्डाने या सिनेमातील ८९ दृश्यांना कात्री लावलीय

कोणताही वाद झाला की, त्याची पहिली प्रतिक्रिया उमटते ती सोशल मीडियावर. नेटिझन्सच्या कल्पनाविष्काराला सोशल मीडियावर नवनवे धुमारे फुटतात. एकाहून एक सरस आणि तितक्याच टोचणाऱ्या पोस्ट आणि कमेंट इथे पाहायला मिळतात. याची प्रचिती पुन्हा एकदा येतेय, ती ‘उडता पंजाब’ सिनेमाच्या वादामुळे. पंजाब राज्याची प्रतिमा मलीन होत असल्याचे कारण देत, सेन्सॉर बोर्डाने या सिनेमातील ८९ दृश्यांना कात्री लावलीय. सेन्सॉर बोर्डावरील हाच राग व्यक्त करण्यासाठी नेटिझन्सनी धाव घेतली, ती सोशल मीडियावर. सोशल नेटवर्किंग साइट्वर सेन्सॉर बोर्डाविरोधात आणि ‘उडता पंजाब’वरून जोक्सचा भडिमार सुरू झालाय.‘उडता पंजाब’च्या या वादावरून नेटिझन्सच्या भन्नाट कमेंट्सनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. या वादानंतर ‘उडता पंजाब’ हे शीर्षक ‘उडता बीप’ असे होईल का, असा खोचक प्रश्न एका नेटिझनने ट्विटरवर विचारलाय, तर ‘उडता पंजाब’ हा सिनेमा आता स्नॅपचॅटवर प्रदर्शित करावा, असा सल्ला एकाने दिलाय. एका नेटिझन्सला या वादामुळे ‘बॉम्बे-टू-गोवा’ या सिनेमाचीही आठवण झालीय. नशीब ‘बॉम्बे टू गोवा’ सिनेमा प्रदर्शित झाला, त्या वेळी सेन्सॉर बोर्डाचे हे लोक नव्हते, अशी पोस्ट करत या नेटिझनने सेन्सॉर बोर्डाला जोरदार चपराक लगावलीय. सिनेप्रेमी आणि नेटिझन्सचा संताप एवढ्यावरच संपलेला नाही. पंजाब म्हणजे बल्ले-बल्ले, मख्खे-दी-रोटी, हडीप्पा-भांगडा, एवढेच का.. हाच का खरा पंजाब, असा प्रश्नही एका नेटिझनने विचारलाय. टीम इंडियाचा क्रिकेटर रवींद्र जडेजा यानेही यावर आपला संताप व्यक्त केलाय. ड्रग्ज माफियांकडून राज्यात ड्रग्जचा सुळसुळाट सुरू आहे, राज्याची वाट लागतेय हे त्यांना चालेल. मात्र, त्यावरील सिनेमा काही चालणार नाही, अशा शब्दांत जडेजाने आपला संताप ट्विटरवर व्यक्त केलाय. या सिनेमातील कटमुळे आता थिएटरमध्ये फक्त राष्ट्रगीत, धूम्रपानविरोधी जाहिरात, संस्कृत श्लोक आणि समाप्त एवढंच बघायला मिळणार, असे मार्मिक ट्विट एकाने केलेय.