एस. एस. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ (Naatu Naatu) या गाण्याने गोल्डन ग्लोब पुरस्कार (Golden Globe-winning song) पटकावत इतिहास रचला. टेलर स्विफ्ट, रिहाना, लेडी गागा यांच्यासारखे दिग्गजांची गाणी स्पर्धेत असताना ‘सर्वोत्तम चित्रपट संगीत’ या प्रकारात ‘आरआरआर’ने बाजी मारली. ज्येष्ठ संगीतकार एम. एम. कीरावानी यांनी संगीतबद्ध केलेले, कालभैरव आणि राहुल सिप्लिगुंज यांच्या आवाजातील या गीताला पुरस्कार मिळाल्याची घोषणा जेना ओर्टेगा हिने व्यासपीठावरून केली आणि आरआरआरच्या चमूने एकच जल्लोष केला. पण हा प्रवास सोपा नव्हता. ‘नाटू नाटू’ हे गाणं लिहिणारे तेलगूचे सुप्रसिद्ध गीतकार व गायक चंद्रबोस (Naatu Naatu Lyricist Chandrabose) यांनी एका मुलाखतीत या गाण्याचा प्रवास उलगडला.
‘नाटू नाटू’ हे गाणं लिहिण्यासाठी त्यांना १९ महिने लागलेत. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत चंद्रबोस यांनी ‘नाटू नाटू’ या गाण्याच्या जन्माबद्दल सांगितलं. ते म्हणाले, ‘नाटू नाटू’ हे ९० टक्के गाणं मी अर्ध्या दिवसात लिहून पूर्ण केलं. पण उर्वरित १० टक्के गाणं लिहायला मला १९ महिने लागले. आरआरआरचे दिग्दर्शक एसएस राजमौलींनी मला एका विशिष्ट सीनसाठी एक खास गाणं लिहायला सांगितलं. मी तीन गाणी लिहिली आणि त्यांना दाखवलीत. यापैकी ‘नाटू नाटू’ त्यांना आवडलं. ‘नाटू नाटू’ ही हूक लाईन मला कारमध्ये सुचली होती. मी लगेच माझ्या सेलफोनमध्ये त्या तीन ओळी रेकॉर्ड करून घेतल्या. यानंतर घरी आल्यावर मी त्यावर आणखी काम केलं.
चंद्रबोस यांचं पूर्ण नाव कनुकुंतला सुभाष चंद्रबोस आहे. १९९५ मध्ये आलेल्या ताजमहल या चित्रपटातून त्यांनी आपल्या करिअरची सुरूवात केली. २७ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी ८५० पेक्षा अधिक चित्रपटांसाठी ३५०० गाणी लिहिली. गीतकार म्हणून त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे.