या चित्रपटाच्या शीर्षकावरूनच हा चित्रपट मराठी बाणा वगैरे दाखवणारा असणार, हे कळून चुकतेच. हा अंदाज या चित्रपटाने अजिबात चुकवलेला नाही. पण यात मांडलेला सीमावादासारखा धगधगीत प्रश्न हाताळताना, मूळ विषय बाजूला राहून यातली प्रेमकहाणीच वरचढ झाल्याचे दिसते. या चित्रपटातून मुळात एक रंगीतसंगीत प्रेमकहाणीच दाखवायची आहे आणि एका ज्वलंत प्रश्नाचा फक्त बाहेरून पाठिंबा घ्यायचा आहे; हेही पुढे समजत जाते. साहजिकच, त्यामुळे यात अंगार फुलण्याऐवजी गुलाबी रंगच अधिक पसरतो आणि मूळ विषय सीमारेषेबाहेरच अडकल्याचे जाणवत राहते. सीमाभागात असलेल्या एका गावातला चौथरा पाडला जाण्यावरून तिथले राजकारण पेटते. काही मराठीजन हा पाडलेला चौथरा पुन्हा उभारतात आणि त्यावरून तिथला कन्नडभाषिक आमदार लिंगप्पा खवळून उठतो. अण्णा हे या गावातले मोठे व्यक्तिमत्त्व असते आणि त्यांच्यापरीने ते मराठीचा लढा लढत असतात. तर शिवा हा तडफदार तरुण मराठी एकता समितीचा कार्यकर्ता असतो आणि मराठीचा कैवार घेत तो या राजकारणात उडी घेतो. हा संघर्ष एका बाजूला वाढत असतानाच लिंगप्पाचा हस्तक आणि गावचा सरपंच चन्ना याची मुलगी सीमा गावात डॉक्टर होऊन परतते. शिवा आणि सीमाचे पुढे सूत जुळते. पण गावातला एक तरुण राचप्पा हासुद्धा सीमावर एकतर्फी प्रेम करत असतो. दुसरीकडे चंद्रमा या तरुणीचे राचप्पावर प्रेम असते. या चौघांच्या प्रेमाची गाथा मांडत ही कथा पुढे वाहवत जाते आणि मूळ विषयाला अधूनमधून स्पर्श करत ही धग केवळ प्रेमापुरतीच उरल्याचे दिसून येते. या चित्रपटाची कथा महेशदादा यांची; तर पटकथा व संवाद प्रताप गंगावणे व अवधूत कदम यांचे आहेत. एक धगधगता विषय या मंडळींनी हाताळला आहे; पण त्याचबरोबर चित्रपट करमणूकप्रधान होण्याकडेही त्यांनी लक्ष पुरवले आहे. मात्र चित्रपटातली ही करमणूकच अधिक झाल्याने मूळ मुद्दा बाजूलाच राहिला आहे. केवळ एक तडका देत मनोरंजन करणारा चित्रपट द्यायचा, असे सादरीकरण या चित्रपटाचे दिग्दर्शक अवधूत कदम यांनी केले आहे. सुरुवातीला हा चित्रपट सीमाप्रश्नाविषयी काही भूमिका मांडणार असे वाटत असतानाच, यात प्रेमाचे कारंजे थुईथुई नाचायला लागतात आणि विषयाला सरळसरळ बगल मिळते. यात नायिकेचे नाव ‘सीमा’ ठेवून खेळला गेलेला खेळ मात्र झकास झाला आहे.मर्द मराठी व्यक्तिमत्त्व म्हणून अमोल कोल्हे याने त्याचे नाव आतापर्यंत काही कलाकृतींतून ठसवले आहे आणि त्याच बाजाची भूमिका त्याला यात शिवा साकारताना करायला मिळाली आहे. त्याने ती अर्थातच चांगली वठवली आहे; पण यात त्याला प्रेमाच्या वगैरे भानगडीत उगाच अडकवल्याचे जाणवत राहते. त्यामुळे त्याच्या धडाकेबाजपणाला दृष्ट लागते. किरण शरद हिने यातली सीमा आश्वासकरीत्या रंगवली आहे आणि यातून भविष्यात तिच्याबद्दलच्या अपेक्षा तिने वाढवून ठेवल्या आहेत. आशिष विद्यार्थी यांनी लिंगप्पा दणक्यात साकारला असला, तरी हा खलनायक अनेकदा साधारण पातळीवर घसरल्याचे जाणवते. राचप्पा रंगवणाऱ्या महेशदादाची कामगिरी रंगबेरंगी आहे. अश्विनी एकबोटे व विद्याधर जोशी यांनी कानडी भूमिकेचे बेअरिंग मस्त पेलले आहे. विक्रम गोखले, तेजा देवकर, विकास पाटील आदींची साथ ठीक आहे. एकूणच, चाखायला जावी झणझणीत मिसळ आणि चव लागावी आमटीची, अशी काहीशी पाककृती या चित्रपटाने समोर ठेवली आहे असे म्हणावे लागेल.
सीमारेषेबाहेरच अडकलेला विषय
By admin | Published: February 06, 2016 1:28 AM