गेम ऑफ थ्रोन्सच्या कलाकाराला झाली कोरोनाची लागण, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 12:15 PM2020-03-17T12:15:20+5:302020-03-17T12:18:43+5:30

गेम ऑफ थ्रोन्सच्या या कलाकाराला कोरोनाची लागण झाल्यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून त्याच्या घरातून बाहेरच पडलेला नाहीये.

Tormund From "Game Of Thrones" Tested Positive For COVID-19 PSC | गेम ऑफ थ्रोन्सच्या कलाकाराला झाली कोरोनाची लागण, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

गेम ऑफ थ्रोन्सच्या कलाकाराला झाली कोरोनाची लागण, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

googlenewsNext
ठळक मुद्देगेम ऑफ थ्रोन्समध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकलेल्या क्रिस्तोफर हिव्ह्यूला कोरोना व्हायरसची लागण झाली असून त्यानेच सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना याविषयी सांगितले आहे.

गेम ऑफ थ्रोन्सचे सगळेच सिझन लोकांचे जीव की प्राण आहेत. या सिझनमधील सगळ्याच कलाकारांना प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले आहे. पण गेम ऑफ थ्रोन्सच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे.

गेम ऑफ थ्रोन्समध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकलेल्या क्रिस्तोफर हिव्ह्यूला कोरोना व्हायरसची लागण झाली असून त्यानेच सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना याविषयी सांगितले आहे. त्याने त्याचा फोटो पोस्ट करत लिहिले आहे की, मी सध्या नोर्वेमध्ये आहे... मी कोरोना व्हायरसची टेस्ट केली असून मला याची लागण झाली आहे. मी आणि माझे कुटुंब सध्या सगळ्यांपासून वेगळे घरात एकटे राहात आहे. माझी तब्येत आता सुधारत असून मला केवळ थोडीशी सर्दी आहे. पण जगात अनेक लोक आहेत, ज्यांना या व्हायरसमुळे प्रचंड त्रास होत आहे. मी लोकांना सांगेन की, त्यांनी आपली काळजी घ्यावी... सतत तुमचे हात धुवा... लोकांपासून कमीत कमी दीड मीटर दूर राहून बोला आणि जमेल तितके घरातच राहा...आपण सगळे मिळून हा व्हायरस अधिकाधिक पसरू नये यासाठी प्रयत्न करू शकतो... सगळ्यांनी एकमेकांची काळजी घ्या आणि लोकांपासून दूर राहा... तुमच्यात या व्हायरसची लक्षणं आढळत असल्यास जवळच्या सेंटरमध्ये जाऊन लगेचच तपासणी करा...  

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून शाळा-कॉलेज बंद केले जात आहेत. तसेच सिनेमाची शूटिंग आणि प्रमोशनही काही काळ थांबवण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर भारतातील अनेक राज्यात मॉल्स, थिएटर बंद करण्यात आले आहेत.

कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून बुधवारी या साथीला महारोगराई घोषित करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती. आगामी दिवस आणि आठवड्यांमध्ये विषाणूबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Tormund From "Game Of Thrones" Tested Positive For COVID-19 PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.