'धमाल' चित्रपटाचा तिसरा भाग 'टोटल धमाल' नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटात माधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूर, अर्शद वारसी, रितेश देशमुख, जावेद जाफरी, जॉनी लिव्हर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला असून कॉमेडी चित्रपटांमध्ये विकेंडला सगळ्यात जास्त कमाई करणारा हा दुसरा चित्रपट ठरला आहे.
टोटल धमाल या चित्रपटाचे दिग्दर्शन इंद्र कुमार यांनी केले असून त्यांचे आजवरचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले आहेत. इंद्र कुमार यांच्या टोटल धमाल या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १६.५० कोटीचा गल्ला जमवला. या चित्रपटाला समीक्षकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या नसल्या तरी या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी २०.४० कोटीचे कलेक्शन केले तिसऱ्या दिवशीपर्यंत या चित्रपटाने ६० कोटीहून अधिक पैसे बॉक्स ऑफिसवर कमावले आहेत.
टोटल धमाल या चित्रपटाला माऊथ पब्लिसिटीमुळेच इतका गल्ला जमवता आला आहे. या चित्रपटाचे कलेक्शन पाहाता हा चित्रपट लवकरच १०० कोटींचा पल्ला पार पाडेल असे म्हटले जात आहे.
विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल १७ वर्षानंतर अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित एकत्र रुपेरी पडद्यावर दिसले आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीलाच ५० कोटी रुपयांचे गुप्त धन आणि ते मिळविण्यासाठी संपूर्ण टीमने केलेले कारनामे पाहायला मिळाले होते. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट पाहाण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते.
या चित्रपटातून हॉलिवूडची अॅनिमल सेलिब्रिटी क्रिस्टलने देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. टोटल धमाल’ हा सिनेमा ‘धमाल’ फ्रेंचाइजीचा तिसरा चित्रपट असून या फ्रेंचाइजीचा दुसरा सिनेमा ‘डबल धमाल’ होता. इंद्र कुमारने काही दिवसांपूर्वी मीडियाशी बोलताना सांगितले होते की, मी अनिल आणि माधुरी दीक्षित जवळपास 26 वर्षांनंतर शूट करतायेत. आम्ही तिघांनी बेटा चित्रपटात एकत्र काम केले होते. ज्याला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले होते. टोटल धमालमध्ये माधुरी आणि अनिल कपूर दोघे नवरा-बायकोच्या भूमिकेत दिसत आहेत. त्यांच्या या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याने ते खूपच खूश आहेत.