Join us

मोहम्मद रफींचा अपमान केल्याने ' ए दिल'ची ' मुश्किल' आणखी वाढली

By admin | Published: November 01, 2016 8:46 AM

विख्यात गायक मोहम्मद रफी यांच्याबद्दल अपमानजनक टिप्पणी करणा-या संवादामुळे ' ए दिल है मुश्किल' चित्रपट आणखी अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ -  फवाद खान या पाकिस्तानी कलाकाराच्या भूमिकेमुळे वादात होरपळून निघालेला करण जोहर दिग्दर्शित ' ए दिल है मुश्किल' हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला खरा मात्र या चित्रपटाच्या अडचणी अद्यापही संपलेल्या दिसत नाहीत. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी यांच्याबद्दल अपमानजनक टिप्पणी करणा-या संवादामुळे नवा वाद उद्भवण्याची चिन्हे दिसत आहेत. 
 
(‘ऐ दिल है मुश्किल’पासून प्रेक्षक दूरच!)
(REVIEW : 'ए दिल...'ची स्टोरी समजण्यास 'मुश्किल')
(मनसेच्या धमकीनंतर फवाद खानची भारतातून 'कलटी'?)
(VIDEO-'ए दिल है मुश्किल'ची पडद्यामागची मज्जा)
 
या चित्रपटातील एका दृश्यामध्ये रणबीर आणि अनुष्कादरम्यान संभाषण सुरू असताना अनुष्काच्या तोंडी ‘मोहम्मद रफी गायचे कमी, (आणि) रडायचे जास्त’ असा एक संवाद आहे. याच संवादावरून नवीन ठिणगी उडाली असून मोहम्मद रफी यांचे कुटुंबिय खूप दुखावले गेले आहेत. ' या संवादामुळे चित्रपटाची कथा ना पुढे जाते ना मागे.. असं असताना हा संवाद लिहिण्याची काय गरज होती?' असा सवाल रफी यांचे पुत्र शाहिद यांनी विचारला आहे. तसेच ' हा या संवादाल करणने परवानगी कशी दिली? रफीसाहब हे श्रेष्ठ गायक होते. ते फक्त माझे वडील होते म्हणून मी हे बोलत नाहीये. आज त्यांना जाऊन ३६ वर्ष झाली असली तरीही इतर गायकांच्या तुलनेत माझ्या वडीलांच्या चाहत्यांची संख्या आजही जास्त आहे. माझे वडील म्हणजे एक संस्था होते, आणि तितकेच विनम्रही.लोक अजूनही त्यांची पूजा करतात, त्यांच्याबद्दल आत्तापर्यंत कोणीही वाईट बोललेलं नाहीये. ( चित्रपटातील) हा संवाद म्हणजे त्यांचा अपमान आहे' अशी संतप्त प्रतिक्रिया शाहिद यांनी व्यक्त केली. 
दरम्यान चित्रपटातील या संवादाबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रख्यात गायक सोनू निगमने ट्विटरवरून याचा समाचार घेतला आहे. ' मोहम्मद रफी गायचे कमी, रडायचे जास्त असा संवाद ऐ दिल है मुश्किल चित्रपटात आहे, हे खरं आहे का?' असा सवाल त्याने चाहत्यांना विचारला असून अनेक चाहत्यांनी तो रीट्विट करत नाराजी दर्शवली आहे. 
एवढंच नव्हे तर आणखी एक ज्येष्ठ गायक मोहम्मद अझीज यांनीही या संवादाची निर्भत्सना केली आहे. ‘ज्या मूर्खाने हा डायलॉग लिहिला आहे त्याच्या या डायलॉगला करण जोहरने परवानगी कशी दिली? असा सवाल त्यांनी विचारला आहे. ' ज्या व्यक्तीला पार्श्वगायनात अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्या व्यक्तीबद्दल तुम्ही असं कसं बोलू शकता? अला प्रश्न त्यांन फेसबूक पोस्टद्वारे विचारला आहे. तसेच यापुढे करणचा एकही चित्रपट पाहणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

 
 
‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटामध्ये अभिनेता रणबीर कपूर, ऐश्वर्या राय बच्चन, अनुष्का शर्मा यांची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटातील पाकिस्तानी कलाकार फवाद खानच्या भूमिकेमुळे मोठा वाद निर्माण झाला होता.  जम्मू-काश्मीरमधील उरी येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २० जवान शहीद झाल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक करून ३८-४० दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशात पाकिस्तानविरोधी वातावरण निर्माण झाले होते. शिवसेना, मनसे या राजकीय पक्षांनी पाक कलाकार, खेळाडू, गायक यांच्याविरोधात भूमिका घेत त्यांना भारतात काम करू देण्यास विरोध दर्शवला होता. त्यामुळे करण जोहरचा ' ए दिल' चित्रपट अडचणीत सापडला होता. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर मनसेने चित्रपटाला सशर्त परवानगी दिली.