Join us

डॉ. श्रीराम लागू यांच्या मुलाचे अपघातात झाले होते निधन, आजही विसरू शकले नाहीत हे दुःख

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 8:00 PM

डॉ. श्रीराम लागू यांच्या आयुष्यात घडलेली एक गोष्ट ते कधीच विसरू शकणार नाहीत.

ठळक मुद्देश्रीराम लागू यांचा मुलगा तन्वीर मुंबई-पुणे ट्रेनने प्रवास करत होता. त्यावेळी झोपडपट्टीतील एका मुलाने ट्रेनवर दगड मारला आणि तो जोरात त्याला लागला. त्यात तो प्रचंड जखमी झाला आणि त्याच्यातच त्याचे निधन झाले.

डॉ. श्रीराम लागू यांनी केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२७ ला झाला. त्यांचा नुकताच वाढदिवस झाला असून त्यांच्याविषयी काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यांच्या सिंहासन, पिंजरा, मुक्ता या चित्रपटांना तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. तसेच त्यांच्या अनेक हिंदी चित्रपटातील भूमिकांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. डॉ. लागू यांनी सुमारे १२५ हून अधिक हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केले आहे. 

डॉ. श्रीराम लागू यांचे शिक्षण पुण्यात झाले आहे. वैद्यकीय महाविद्यालयात असताना त्यांनी नाटकात काम करायला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी नाट्य संस्था सुरू केली. त्यांनी कान नाक घसा यांच्या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतले आणि पुण्यात काम केले. कॅनडा, इंग्लंड येथे ते पुढील शिक्षण घेण्यासाठी गेले. ते वैद्यकीय व्यवसायात असले तरी त्यांना अभिनयाविषयी अधिक आवड होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या डॉक्टरी पेशाला अलविदा म्हणत 1969 मध्ये वसंत कानेटकरांच्या ओशाळला मृत्यू या नाटकापासून त्यांच्या अभिनयकारकिर्दीला सुरुवात केली. 

डॉ. लागू हे प्रसिद्ध अभिनेते असून त्यांच्या अभिनयाने त्यांनी मराठी आणि बॉलिवूड चित्रपटसृष्टीत त्यांची एक जागा निर्माण केली आहे. त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. त्यांच्या आयुष्यात घडलेली एक गोष्ट ते कधीच विसरू शकणार नाहीत. नाट्यअभिनेत्री दीपा लागू या त्यांच्या पत्नी असून त्यांच्या मुलाचे नाव तन्वीर होते. पण एका अपघातात त्यांचे निधन झाले. श्रीराम लागू यांचा मुलगा तन्वीर मुंबई-पुणे ट्रेनने प्रवास करत होता. त्यावेळी झोपडपट्टीतील एका मुलाने ट्रेनवर दगड मारला आणि तो जोरात त्याला लागला. त्यात तो प्रचंड जखमी झाला आणि त्याच्यातच त्याचे निधन झाले. ही घटना 1994 मध्ये घडली. त्याच्या स्मरणार्थ 2004 पासून श्रीराम लागू आणि त्यांच्या पत्नीने ज्येष्ठ रंगकर्मीना तन्वीर सन्मान हा पुरस्कार देण्यास सुरुवात केली.  

टॅग्स :श्रीराम लागू