25 जून 1983 हा दिवस क्रिकेटप्रेमी कधीही विसरू शकणार नाही. याच दिवशी कपिल देव यांच्या क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकून इतिहास रचला होता. या क्षणाची विजयगाथा सांगणारा ‘83’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. त्याआधी नुकताच या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च झाला तो सुद्धा जगातील सर्वात उंच इमारत म्हणून मान पटकावणा-या दुबईच्या जगप्रसिद्ध बुर्ज खलिफावर. होय, बुर्ज खलिफावर 83 चा ट्रेलर झळकला आणि तो पाहून या चित्रपटाची अख्खी टीम भावुक झाली. कपिल देव (Kapil Dev) हे सुद्धा या क्षणाचे साक्षीदार होते. ते देखील हा क्षण डोळ्यांत साठवताना भावुक झालेले दिसले.
याचे काही व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात दीपिका (Deepika Padukone) व रणवीर (Ranveer Singh) बुर्ज खलिफासमोर उभे राहून ट्रेलर पाहत आहेत. एका क्षणाला दीपिका अचानक भावुक होते आणि रणवीरचा हात पकडते. यावेळी दिग्दर्शक कबीर खान, त्यांची पत्नी मिनी माथूर, कपिल देव, मोहिंदर अमरनाथ हे सुद्धा भावुक होतात.
दुबईतील सर्वांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू म्हणजे बुर्ज खलिफा. 2010मध्ये बांधण्यात आलेल्या बुर्ज खलिफानं संपूर्ण जगाचे लक्ष वेधले ते त्याच्या उंचीमुळे. बुर्ज खलिफाची उंची ही 829.8 मीटर म्हणजेच 2722 फुट इतकी आहे. ‘83’ या चित्रपटाबद्दल सांगायचं तर रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटात रणवीरने कपिल देव यांची तर दीपिकाने कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया हिची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन कबीर खान तर निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे. 83 हा चित्रपट 1983चा विश्वचषक जिंकलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या कथेवर आधारित आहे. हा चित्रपट 24 डिसेंबर 2021 रोजी रिलीज होणार आहे.