सेन्सॉर बोर्डानं 'ठाकरे' चित्रपटातील 'या' संवादांवर नोंदवला आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 02:53 PM2018-12-26T14:53:03+5:302018-12-26T16:05:55+5:30
चित्रपटातील तीन संवादांवर सेन्सॉर बोर्डाचा आक्षेप
मुंबई: शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित 'ठाकरे' चित्रपटाचा ट्रेलर थोड्याच वेळात लॉन्च होणार आहे. मात्र या चित्रपटातील तीन संवादांवर सेन्सॉर बोर्डानं आक्षेप नोंदवला आहे. ठाकरे चित्रपटाची निर्मिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्यामुळे सेन्सॉर बोर्डानं घेतलेल्या आक्षेपांवर शिवसेनेची भूमिका नेमकी काय असणार, याबद्दल उत्सुकता आहे.
शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची अनेक भाषणं, त्यामधील विधानं वादात सापडली. त्याचप्रमाणे ठाकरे यांच्या आयुष्यावर बेतलेला चित्रपटदेखील काहीसा वादात सापडताना दिसत आहे. या चित्रपटातील तीन संवादांवर सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेतला. यातील एक संवाद बाबरी मशिदीशी निगडीत आहे. तर दुसरा संवाद हा दक्षिण भारतीयांशी संबंधित आहे. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला मुंबईतील दक्षिण भारतीयांवर कडाडून टीका केली होती. दक्षिण भारतीयांमुळे स्थानिक मराठी माणसाचा रोजगार जातो, अशी भूमिका त्यावेळी बाळासाहेबांनी घेतली होती. यावर आधारित चित्रपटातील संवादावर सेन्सॉर बोर्डानं हरकत नोंदवली. या संवादात 'यांडू गुंडू' असे शब्द आहेत.
सेन्सॉर बोर्डानं ठाकरे चित्रपटातील संवादांवर आक्षेप नोंदवल्यावर निर्माते संजय राऊत यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. 'सेन्सॉर बोर्डाच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. त्यावर काम सुरू आहे. मात्र याचा कोणताही परिणाम ट्रेलर लॉन्चवर होणार नाही,' अशी माहिती त्यांनी दिली. बाळासाहेबांची विधानं कायमच वादात सापडली. तीच त्यांची शैली होती, असंही राऊत म्हणाले. ठाकरे चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत आहे. 23 जानेवारी 2019 रोजी म्हणजेच बाळासाहेबांच्या जयंतीला हा चित्रपट प्रदर्शित होईल.