‘कौन बनेगा करोडपती’च्या माध्यमातून अमिताभ बच्चनने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. यामुळे भारतीय टेलिव्हिजनचे स्वरूपच बदलले असे सांगितले जाते. बिग बीने या माध्यमातून चित्रपट अभिनेत्यांसाठी छोट्या पडद्यावर येण्याचा मार्ग प्रशस्त केला, असे म्हणायलाच हवे. ‘केबीसी’ला मिळालेले यश भारावून टाकणारे होते. अनेक मोठ्या स्टार्सनी छोट्या पडद्यावर काम करण्यास सुरुवात केली. अमिताभ बच्चननंतर शाहरूख खान, सलमान खान, आमीर खान, अक्षय कुमार, हृतिक रोशनपर्यंतचे कलाकार लहान पडद्यावर ‘शो’चे पाहुणे म्हणून दिसू लागले. हिंदीच्या दिग्गज चॅनेलनीदेखील मोठ्या स्टार्ससाठीच्या ‘गेम शो’ आणि ‘रिअॅलिटी शो’चा मसाला तयार केला, आजही असे अनेक शो कित्येक चॅनेल्सवर दिसत आहेत. या शोसाठी चॅनेल्सकडून पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो. मोठे प्रमोशनही केले जाते, शिवाय स्टार्सना मोठी रक्कम देण्यात येते.चॅनेल्स मोठ्या स्टार्सना आपल्या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यासाठी उत्सुक असल्याने टीव्हीमधूनही चित्रपट कलावंतांना सहज पैसा मिळू लागला. सुरुवातीला या प्रयोगाला यशही मिळाले. यामुळे अनेक स्टार्सचे दिवस पालटले. मात्र आता चित्रपट अभिनेत्यासोबतचे ‘शो’ चॅनेलना महागात पडू लागले आहेत. केबीसी आणि बिग बॉस सोडले तर कित्येक चॅनेलना मोठ्या कलाकारांमुळे तोटा सहन करावा लागला. फरहान अख्तरने झी टीव्हीसाठी एक शोला होस्ट केले होते. यामुळे या चॅनेलला मोठा तोटा सहन करावा लागला. सोनी चॅनेलवर प्रसारित होणारा अरबाज खान-मलाइका अरोरा खान यांनी होस्ट केलेला ‘गेम शो’ फ्लॉप ठरला आहे. विशेष म्हणजे टीआरपीच्या खेळात कुठेच टिकला नाही. एवढेच नाही तर शाहरूख खानने अॅण्ड टीव्हीच्या एका शोच्या सुरुवातीला अँकरिंग केली, मात्र शो नाही चालला.
- anuj.alankar@lokmat.com