Tu Jhoothi Main Makkaar Advance Booking : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor ) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘तू झूठी मैं मक्कार’ हा चित्रपट येत्या ८ मार्चला रिलीज होतोय. सध्या या सिनेमाची जोरदार हवा आहे. सिनेमाचा ॲडव्हान्स बुकिंगलाही जबरदस्त प्रतिसाद मिळतोय.शनिवारी संध्याकाळपासून ‘तू झूठी मैं मक्कार’च्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली. खाास म्हणजे, पहिल्या दिवसाच्या ॲडव्हान्स बुकिंगचा तुफान प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवसाच्या ॲडव्हान्स बुकिंगचे आकडा पाहता रणबीर-श्रद्धाचा हा चित्रपट दमदार कमाई करणार असल्याचा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत. शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट सोडता अलीकडे आलेले बॉलिवूडचे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेत. अक्षय कुमारचा कार्तिक आर्यनच्या ‘शहजादा’ आणि अक्षय कुमारच्या ‘सेल्फी’ दोन्ही सिनेमे दणकून आपटलेत. अशात ‘तू झूठी मैं मक्कार’कडून बॉलिवूडला मोठ्या अपेक्षा आहेत.
‘तू झूठी मैं मक्कार’च्या पहिल्या दिवसाच्या ॲडव्हान्स बुकिंगमध्ये सुमारे ७० हजार तिकिटं विकली जाण्याची आशा आहे. रविवारी रात्रीपर्यंत या चित्रपटाचे देशभरात जवळपास 30 हजार तिकिटं विकली गेली आहेत. या विक्रीतून जवळपास 1 कोटी रुपये कमाई होण्याची शक्यता आहे. ट्रेंड पाहता रणबीर-श्रद्धाचा हा चित्रपट पहिल्या दिवशी जवळपास 15 कोटी रुपयांची कमाई करू शकतो. असं झाल्यास हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग करणारा पाचवा चित्रपट ठरेल. याआधी पठाण, ब्रह्मास्त्र, सूर्यवंशी आणि भुल भुलैय्या 2 यांसारख्या चित्रपटांनी पहिल्या दिवशी चांगली कमाई केली होती.
‘तू झूठी मैं मक्कार’ हा सिनेमा लव रंजन यांनी दिग्दर्शित केला आहे. लव रंजन यांचा याआधीचा ‘सोनू के टीटू की स्वीटी’ सुपरडुपर हिट झाला होता. या चित्रपटानंतर सुमारे चार वर्षांनंतर लव रंजन ‘तू झूठी मैं मक्कार’सोबत मोठ्या पडद्यावर परतत आहेत.
‘तू झूठी मैं मक्कार’ हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट असून त्यात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रणबीर व श्रद्धा पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. याशिवाय डिंपल कपाडिया, बोनी कपूर आणि कॉमेडियन अनुभव सिंग बस्सी हे सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. अभिनेता म्हणून बोनी कपूर यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.