व्यवसाय-नोकरी माणसाला जगवते पण कला माणसाला कसं जगायचं हे शिकवते. अंगभूत कलेला साधनेची जोड द्यावी लागते, पण सध्याच्या जागतिकीकरणाच्या वेगात माणसाला स्वतःत दडलेल्या कलाकाराला तितकासा वेळ देता येत नाही. पण अशातही एखादा माणूस कलेच्या साथीने स्वतःचा उत्कर्ष साधतो...त्यासाठी आवश्यकता असते ती कलेप्रती समर्पित भावनेची, आणि त्याला जोड द्यावी लागते अथक परिश्रमांची. आपल्या कलेवरच्या प्रेमापोटी सर्वस्व पणाला लावून स्वतःच ध्येय साध्य करणाऱ्या एका तरुणाची कथा ‘तू तिथे असावे’ चित्रपटाच्या माध्यमातून ७ डिसेंबर ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
संगीत हाच एक ध्यास आणि श्वास बनलेल्या एका गायकाचा प्रवास या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या प्रवासात त्याच्यासमोर येणाऱ्या समस्या, त्याच्या मार्गात निर्माण होणारे अडथळे आणि तरीही ध्येयापासून परावृत्त न होता तो जिद्दीने स्वतःचं स्वप्न कसं पूर्ण करतो, त्यात त्याला कोणाकोणाची मदत मिळते, कोणाच्या सोबतीने हा प्रवास सुखकर होतो हे या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे.
एका गायकाच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारलेला असल्याने चित्रपटाची कथा ही गीत-संगीताच्या पार्श्वभूमीवर जाते. आदर्श शिंदे, नेहा राजपाल, वैशाली माडे, स्वप्निल बांदोडकर, बेला शेंडे, जसराज जोशी, धनश्री बुरबुरे या नामवंत गायकांनी या चित्रपटातली गाणी गायली आहेत. मंदार चोळकर, डॉ. श्रीकृष्ण राऊत, दौर सैफी, पार्वस जाधव यांनी कथेला साजेशी गीतं लिहिली आहेत. दिनेश अर्जुना यांनी प्रसंगानुरूप चाली देत गीतं संगीतबध्द केली आहेत. पार्श्वसंगीत समीर फातर्फेकर यांचे आहे. संतोष गायकवाड दिग्दर्शित आणि गणेश पाटील निर्मित ‘तू तिथे असावे’ हा चित्रपट संगीतप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे.
आकाश कांडुरवार, शरद अनिल शर्मा, प्रशांतजी ढोमणे, सुरभी बुजाडे हे सह-निर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि पटकथा आशिष विरकर यांनी लिहिली आहे. संवाद आशिष विरकर आणि दिपक अंगेवार यांचे आहेत. छायांकन बाशालाल सय्यद यांचे असून संकलन मन्सूर आझमी यांचे आहे. कलादिग्दर्शन महेंद्र राऊत आणि गजानन फुलारी यांचे आहे. रोहितोष सरदारे कार्यकारी निर्माते आहेत. ‘तू तिथे असावे’ ७ डिसेंबर ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.