‘तुझ्यात जीव रंगला’ ( Tujhyat Jeev Rangala) या मालिकेतील राणादा व पाठकबाई अर्थात अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) व अक्षया देवधर (Akshaya Deodhar) एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. अचानक साखरपुड्याचे फोटो शेअर करत या दोघांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. त्याआधी दोघांनीही आपल्या नात्याची भणकही कुणाला लागू दिली नव्हती. अचानक त्यांच्या साखरपुड्याचे फोटो पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. आता चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती या जोडप्याच्या लग्नाची. तर लगीनघाई सुरू झाली आहे. दुसरीकडे या जोडप्याचं प्रेमही बहरताना दिसतंय. अक्षयाने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून तुम्हीही हेच म्हणाल.
मन रानात गेलं ग..., असं कॅप्शन दे अक्षयाने हार्दिकसोबतचा एक रोमॅन्टिक व्हिडीओ शेअर केला आहे. यात अक्षयला जांभळ्या रंगाच्या साडीत कमालीची सुंदर दिसतेय. हार्दिकचा हात हातात घेत दोघंही पायºया चढू लागतात, ते पाहून हे कपल मेड फॉर इच अदर असल्याची खात्री पटते.या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. सुपर कपल अशा कमेंट्स अनेक चाहत्यांनी केल्या आहेत. लाखात एक जोडी अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली आहे. पाठक बाई, एकदम झक्कास, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.
अक्षया आणि हार्दिक लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांच्या केळवणालाही सुरूवात झाली आहे. पुण्यात त्याचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. नुकतंच दोघांनी ‘चला हवा येऊ द्या’मध्ये हजेरी लावली होती. तेव्हा लग्न कधी आणि कुठे करणार असा प्रश्न विचारल्यानंतर दोघेही पुण्यात लग्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. लग्नाची तारीख मात्र अद्या गुलदस्त्यात आहे.