झी मराठीवरील 'तुला पाहते रे' मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली असून टी.आर.पी.चे उच्चांक देखील गाठले आहेत. अभिनेता सुबोध भावेने या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन केलंय. या मालिकेत त्याच्या जोडीला नवोदित अभिनेत्री गायत्री दातार पाहायला मिळत आहे. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळतंय. 'विक्रांत' आणि 'ईशा' यांच्या भूमिकांभोवती जरी या मालिकेची कथा फिरत असली, तरी ईशाची आई सौ. निमकर यांचीही भूमिका तेवढ्याच ताकदीची आहे. ईशाच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री गार्गी फुले-थत्ते या दिवंगत अभिनेते निळू फुले यांची कन्या आहेत. अभिनयाच्या बाबतीत त्यांच्या वडिलांनी म्हणजेच निळू फुले यांनी दिलेली शिकवण त्यांच्या आजही चांगलीच लक्षात आहे.
निळू फुले गार्गी यांना नेहमीच सांगायचे की, तू कॅमेऱ्यासमोर असशील तेव्हा तू स्वतः अमिताभ बच्चन आहेस असेच समज... तुझ्यासमोर कितीही प्रसिद्ध कलाकार असला तरी तुझा अभिनय दमदारच असला पाहिजे... त्यांची ही शिकवण आजही गार्गी यांच्या चांगलीच लक्षात आहे.
गार्गी यांनी 'तुला पाहते रे' पूर्वी देखील काही मालिकांमध्ये काम केले आहे. कट्टी बत्ती या मालिकेत त्यांनी काही महिन्यापूर्वी काम केले होते. या मालिकेच्या वेळीच त्यांना 'तुला पाहते रे या मालिकेविषयी विचारण्यात आले होते. पण त्यांच्या कट्टी बत्ती मालिकेचे चित्रीकरण सुरु असल्याने त्यांनी 'तुला पाहते रे या मालिकेसाठी नकार दिला होता. पण या मालिकेचे निर्माते गार्गी यांच्यासाठी थांबले. त्यांची कट्टी बत्ती ही मालिका संपल्यानंतरच या मालिकेचे चित्रीकरण सुरु झाले असल्याने या मालिकेत त्यांना काम करता आले.
झी मराठी वरील 'तुला पाहते रे' मालिकेतील सौ. निमकरांची म्हणजेच ईशाच्या आईची भूमिका अल्पावधीतच रसिकांच्या पसंतीस पडली आहे. 'तुला पाहते रे' या मालिकेत गार्गी फुले-थत्ते म्हणजेच ईशाची आई चाळीत राहणार्या, एका मध्यमवर्गीय गृहिणीची भूमिका साकारत आहेत. आपल्या नशिबी आलेली गरिबी आणि तडजोड मुलीच्या आयुष्यात येऊ नये म्हणून तिच्यासाठी श्रीमंत वर शोधण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.