मुंबई- टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) आत्महत्येने मनोरंजनविश्वात चांगलीच खळबळ उडाली आहे. तिने मालिकेच्या सेटवर गळफास लावून जीवन संपवलं. तुनिषा २० वर्षांची होती आणि आतापर्यंत तिने अनेक मालिकांमध्ये काम केलंय. याप्रकरणी वालीव पोलिसांनी तुनिषाचा प्रियकर आणि मालिकेतील तिचा सहकलाकार मोहम्मद शिझान याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केली आहे.
शिझानने प्रेमसंबंध तोडल्याने निराश झाल्याने तुनिषाने आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या आईने दिली होती. दुपारी शिजान आणि तुनिषा या दोघांनी एकत्र त्याच्या रूममध्ये जेवण केले. त्यानंतर शिझान हा सेटवर शूटिंगसाठी गेला आणि शीजानच्या रूममध्येच तिने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. अली बाबा या टीव्ही शोमध्ये शीजान हा तुनीषाचा सहकलाकार होता. तुनिषाच्या मृत्यूनंतर अभिनेत्री स्नेहा वाघ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
तुनीषा शर्माच्या टॅटूने नेटकऱ्यांचे वेधले लक्ष; पोस्ट होतेय व्हायरल, पण काय लिहिलं होतं?, पाहा
तुनिषाच्या मृत्यूने स्नेहा वाघलाही धक्का बसला आहे. स्नेहा म्हणाली की, तुनिषा खूप खूश होती. मी तिच्यासोबत काम केले आहे. तुनिषा सेटवर नेहमी आनंदी असायची. मात्र प्रत्येक व्यक्तीची दुसरी बाजू असते, परंतु मी तिच्यासारखी मुलगी दुसरी कधीही पाहिली नाही, असं कौतुक स्नेहा वाघने केलं आहे. तसेच आपण अनेकदा मानसिक आरोग्याबद्दल बोलतो, पण अनेक मुद्द्यांकडे दुर्लक्ष करतो. या बाबतीत लोकांनी अधिकाधिक जागृत होण्याची गरज असल्याचं स्नेहा वाघ यांनी सांगितलं.
मानसिक आरोग्याबद्दल बोलणे आवश्यक-
स्नेहा म्हणाली की, आपण खूप विचित्र समाजात राहत आहोत. लोकांना नेहमी आपल्याला आनंदी बघायला आवडते आणि ज्या वेळेस आपल्या चेहऱ्यावर आनंदाच्या ऐवजी दुःख दिसू लागते तेव्हा लोक आपल्याला जज करायला सुरुवात करतात. अभिनेता म्हणून लोक आमच्याकडे जास्त लक्ष देतात, असं स्नेहा वाघने सांगितले. तसेच मला आशा आहे की, आम्ही या समस्या गांभीर्याने घेण्यास सुरुवात करू आणि एखाद्याची चेष्टा करणे थांबवू, असंही स्नेहा वाघ म्हणाली.
स्नेहा वाघ अन् तुनिषाने एकत्र केलंय काम-
स्नेहा वाघ आणि तुनिषा शर्मा यांनी 'शेर-ए-पंजाब महाराजा रणजीत सिंह' या मालिकेत एकत्र काम केले आहे. ही मालिका लाइफ ओके वाहिनीवर २०१७मध्ये प्रसारित झाली होती. यामध्ये स्नेहा वाघने रणजित सिंगची आई राज कौर यांची भूमिका साकारली होती. तर, तुनिषाने रणजीत सिंगच्या पहिल्या पत्नी मेहताब कौरची भूमिका साकारली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"