'तुझ्यात जीव रंगला',' तू चाल पुढं' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये ग्रे शेड भूमिका साकारुन नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगांवकर. उत्तम अभिनयामुळे तेजश्री अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे. मूळची पुण्याची असलेल्या धनश्रीने नुकतंच मुंबईमध्ये तिचं हक्काचं घर घेतलं आहे. सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट करत तिने तिच्या या नव्या घराची माहिती चाहत्यांना दिली. त्यानंतर आता तिने घर घेण्याच्या प्रवासाविषयी सांगितलं आहे.
अलिकडेच धनश्रीने तिच्या युट्यूब चॅनेलवर तिच्या घराची गोष्ट सांगितली. हे घर घेतांना तिला कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागलं हे तिने यात सांगितलं आहे. विशेष म्हणजे तिने हे घर खरेदी करण्यासाठी एक एक रुपया जोडल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर घर खरेदी केल्यानंतर इंटेरिअरसाठी पैसेच उरले नव्हते असंही तिने यावेळी सांगितलं.
"सध्या मी माझ्या नवीन घरी आहे. मी अधूनमधून इथे येत असते. कारण, या घराचं इंटेरिअर बाकी आहे आणि ते कसं करायचं, काय करायचं याविषयी मी विचार करत असते. माझे काही मित्र-मैत्रिणी आहेत त्यांच्याशी चर्चा करत असते. आता एक जण आलेत जे मला इंटेरिअर कसं करायचं हे सांगतायेत. पण, या इंटेरिअरचा खरंच खूप खर्च आहे. घर खरेदी करण्यामध्येच सगळे पैसे गेलेले आहेत. त्यामुळे इंटेरिअरसाठी काही पैसे उरलेले नाहीयेत. आम्ही ठरवलं होतं की ऑक्टोबर २०२३ पर्यंत नवीन घरात राहायला जायचं. दुर्वेशचा १० ऑक्टोबरला वाढदिवस असतो त्यामुळे तोपर्यंत मुंबईत आपलं घर करायचं असं आमचं आधीच ठरलं होतं. विशेष म्हणजे हे ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही घरात तसं लिहून सुद्धा ठेवलं होतं जेणेकरुन सकारात्मक विचार कायम राहतील, असं धनश्री म्हणाली.
पुढे ती म्हणते, तू चाल पुढं ही मालिका घेतल्यानंतर ३-४ महिन्यात आम्ही मुंबईत घर शोधायला सुरुवात केली. हे घर पाहिल्यानंतर आम्हाला दोघांनाही ते खूप आवडलं. कारण हवेशीर जागा, सुंदर आहे. आम्हाला वरचा मजला हवा होता. पण, तो काही मिळाला नाही. हे घर दुसऱ्या मजल्यावर आहे. पुढे आम्ही असा विचार केला की जे आहे ते छान आहे सगळं. शेवटी आम्हाला घराचं पझेशन मिळालं आणि आता हळूहळू फर्निचरचं काम सुरु झालंय. काही दिवसांमध्येच आम्ही इथे शिफ्ट होऊ."
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच धनश्रीने मुंबईत घर घेतलं आहे. धनश्री सध्या तू चाल पुढं या मालिकेत शिल्पी ही भूमिका साकारत आहे. शिल्पी ही ग्रे शेड भूमिका असली तरीदेखील तिला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.