Join us

"दो कौडी का तू Actor..." अज्ञात चालकाकडून टीव्ही अभिनेता करण वाहीला शिव्या, तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 17:52 IST

अनेकदा सेलिब्रिटींसोबत अनोळखी लोक विचित्र वागताना दिसतात.

हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता करण वाही (Karan Wahi) सध्या चर्चेत आहे. करणने अनेक हिंदी मालिकांमध्ये भूमिका साकारल्या असून काही लोकप्रिय रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालनही केलं आहे. 'दिल मिल गए' (Dil Mil Gaye) मालिकेतील डॉ सिद्धांत मोदी या भूमिकेतून तो तरुणींच्या अतिशय लाडका बनला. सध्या करणबद्दल एक अपडेट समोर आली आहे. एका अनोळखी व्यक्तीविरोधात करणने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण बघुया.

अनेकदा सेलिब्रिटींसोबत अनोळखी लोक विचित्र वागताना दिसतात. कधीकधी नाहक त्रासही देतात. नुकतंच करण वाहीलाही असाच अनुभव आला असून त्याने संपूर्ण घटना सोशल मीडियावर शेअर केली आहे. कारमधून घरी जाताना त्याच्यासोबत विचित्र घटना घडली. तो लिहितो, "कारमधून जात असताना मी उजवा कट घेतला कारण माझ्यासमोर एक कार होती. तेवढ्यात स्कुटीवरील एक माणूस आला आणि मला शिव्या द्यायला लागला. कट कसा मारलास असं तो म्हणत होता. तुझ्यासारखे दोन पैशाचे बरेच टीव्ही अभिनेते पाहिले आहेत. मी त्याच्या स्कुटीची चावी घेतली, नंतर त्याला परत दिली आणि तिथून निघालो."

तो पुढे लिहितो, " जोवर मी पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचत नाही तोवर त्या माणसाने माझा पाठलाग केला. मला शिव्या देत होता आणि माझी पोलिसात फार ओळख आहे असं सांगत होता. तसंच माझ्याकडून त्याला पैसे उकळायचे होते. मी आता सुरक्षित घरी पोहोचलो आहे. पोलिसांशी बोललो आहे मला आशा आहे ते हे प्रकरण मिटवतील."

करण वाही आगामी 'रायसिंघानिया व्हर्सेस रायसिंघानिया' या कोर्ट रुम ड्रामा वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. यामध्ये त्याने वकिलाची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री जेनिफर विंगेट मुख्य भूमिकेत आहे. 

टॅग्स :करण वाहीटिव्ही कलाकारमुंबई पोलीसकार