अतरंगी फॅशन स्टाइल आणि हटक्या अंदाजामुळे बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग कायमच चर्चेत असतो. अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये जम बसवणारा रणवीर मात्र सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. रणवीरने नुकतीच पॉर्नस्टार जॉनी सिन्सबरोबर एक जाहिरात केली आहे. या जाहिरातीतून पुरुषांच्या लैंगिक समस्येवर भाष्य करण्यात आलं आहे. अतिशय गंभीर अशा विषयावर या जाहिरातीतून विनोदी पद्धतीने भाष्य करण्यात आलं आहे. ही जाहिरात प्रचंड व्हायरल झाली असून यामुळे रणवीर सिंग पुन्हा चर्चेत आला आहे.
रणवीर सिंगची आणि जॉनी सिन्सच्या या जाहिरातीत मालिकेतील प्रसंग दाखवण्यात आला आहे. त्यामुळे ही जाहिरात पाहून प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री भडकली आहे. अभिनेत्री रश्मी देसाईने या जाहिरातीवरुन संताप व्यक्त केला आहे. रश्मीने रणवीरच्या या जाहिरातीबाबत इन्स्टावर एक संतप्त पोस्ट लिहिली आहे. "हे खूपच अनपेक्षित कोलाब आहे...मी प्रादेशिक इंडस्ट्रीपासून माझ्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर मी टेलिव्हिजन इंडस्ट्रीकडे वळले. लोक याला छोटा पडदा असं म्हणतात. जिथे प्रेक्षक बातम्या, क्रिकेट, बॉलिवूडचे चित्रपट अशा सर्वच गोष्टी पाहतात," असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पुढे ती म्हणते, "हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला जाणवलं की यातून टीव्ही इंडस्ट्री आणि त्यात काम करणाऱ्या लोकांचा अपमान केला गेला आहे. कलाकारांना मोठ्या पडद्यावरही काम करायचं असतं. पण, आम्हाला अशाच पद्धतीची वागणूक मिळते. प्रत्येक जण खूप मेहनत घेतो. पण, टीव्हीवरील मालिकांमध्ये हे सगळं दाखवत नाहीत. हे सगळं मोठ्या पडद्यावर दाखवलं जातं. खरी परिस्थिती दाखवण्यात काहीच चुकीचं नाही. पण, टीव्ही इंडस्ट्रीसाठी हा रिएलिटी चेक आहे. मला माझ्या कानशिलात लगावल्यासारखं वाटत आहे. कदाचित मी यावर खूप तीव्र प्रतिक्रिया देत असेन. पण, आम्ही आपली संस्कृती दाखवतो. आणि मला वाईट वाटतंय. कारण, टीव्ही इंडस्ट्रीमध्ये माझा प्रवास आदरयुक्त राहिलेला आहे. तुम्हाला भावना कळतीच हीच अपेक्षा."
रणवीर सिंग आणि जॉनी सिन्सची ही जाहिरात TakeBoldCareOfHer या कॅम्पेनचा एक भाग आहे. बोल्ड केअरचा रणवीर ब्रँड अम्बेसिडर आहे. या जाहिरातीतून त्यांनी लैंगिक संबंधांवर भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.