समाजात असे विकृत लोक असतात ज्याचा सामना अनेक मुलींना, महिलांना करावा लागतो. रस्त्यावर चालताना असो किंवा बस, ट्रेन सारख्या पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये वाईट नजरेने पाहणारे, घाणेरडे चाळे करणारे विकृत माणसं दिसतात. सामान्य महिलाच नाही तर अभिनेत्रींनाही असा अनुभव आला आहे. एका टीव्ही अभिनेत्रीने नुकतंच तिला बसमध्ये आलेला धक्कादायक अनुभव सांगितला.
'इस प्यार को क्या नाम दूँ', 'मिले जब हम तुम' या मालिकांमधून सर्वांना प्रेमात पाडणारी अभिनेत्री सनाया ईरानी (Sanaya Irani). सनायाने नुकतीच 'हॉटरफ्लाय'ला मुलाखत दिली. यावेळी तिने मनोरंजनसृष्टीतील कास्टिंग काऊचपासून दैनंदिन जीवनात आलेल्या धक्कादायक अनुभवाविषयी सांगितले. ती म्हणाली, "एक दिवस मी बसमधून घरी चालले होते. तेव्हा मला माझ्या गुडघ्याला काहीतरी लागतंय असं जाणवलं. आधी वाटलं की किडा वगरे असेल म्हणून मी न पाहताच झटकलं. पण नंतर परत जाणवायला लागलं तेव्हा मी पाहिलं तर मागे बसलेला माणूस सीटमधील गॅपमधून माझ्या गुडघ्याला हात लावत होता. नंतर तो उठला आणि दुसऱ्या सीटवर बसला. तिथून तो मला सतत पाहत होता आणि चक्क पँटची झीप उघडून अश्लील चाळे करत होता. माझ्या मैत्रिणीने मला आपण पुढच्या स्टॉपला उतरु असं सुचवलं. सुरुवातीला मी याविरोधात आवाज उठवणार होते, पण स्टॉप आल्याने आम्ही उतरलो. खरं सांगायचं तर तो खूप भयानक अनुभव होता."
आणखी एक घटना सांगत ती म्हणाली, "एकदा एक माणूस बसस्टॉपवर बसून अश्लील चाळे करत होता आणि तो माझ्याकडे पाहून जसं काय मला बोलवत होता. त्याची नजरच अतिशय विकृत होती. त्यावेळी मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं."
या सर्व घटनेनंतरही सनायाला मुंबई सुरक्षित वाटते. असेअनुभव येणारी मी काही पहिली नसेल असंही ती म्हणाली. सनायाने 'फना' सिनेमातून बॉलिवू़डमध्ये पदार्पण केलं होतं. 2019 साली तिचा 'घोस्ट रिलीज झाला होता. सनायाला बॉलिवूडमध्येही कास्टिंग काऊचचा अनुभव आला आहे. दरम्यान ती टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे.