छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मास्टरशेफ इंडिया 8 चा (Masterchef India 8) ग्रँड फिनाले नुकताच पार पडला यंदाच्या पर्वात कर्नाटकातील मोहम्मद आशिक (Mohammed Aashiq) याने बाजी मारली असून मास्टरशेफ इंडियाची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. मात्र, त्याचा हा प्रवास सोपा नव्हता. या कार्यक्रमात येण्यापूर्वी मोहम्मद एक ज्यूस सेंटर चालवत होता. त्यामुळे सध्या त्याचा हा संपूर्ण प्रवास चर्चेत येत आहे.
मास्टरशेफ इंडिया 8चं पर्व जिंकणाऱ्या मोहम्मद आशिकला तब्बल २५ लाख रुपयांची रक्कम बक्षीस स्वरुपात देण्यात आली आहे. त्यामुळे त्याची सोशल मीडियावर कमालीची चर्चा रंगली आहे. जवळपास ८ आठवडे का कार्यक्रम सुरु होता. नुकताच ८ डिसेंबर रोजी या शोचा ग्रँड फिनाले सोहळा रंगला आणि यंदाच्या पर्वाला त्याचा विजेता मिळाला. या शोमध्ये देशभरातून अनेक उत्तम स्पर्धक सहभागी झाले होते. मात्र, या सगळ्यांना मागे टाकत मोहम्मद आशिकने बाजी मारली. विशेष म्हणजे या कार्यक्रमात येण्यापूर्वी मोहम्मद आशिक कर्नाटकमध्ये कुकू की हब या नावाने ज्यूस सेंटर चालवत होता. त्यामुळे त्याचा हा सगळा प्रवास थक्क करणारा आहे.
२४ वर्षीय मोहम्मद आशिक याला स्वयंपाक करणं, नवनवीन पदार्थ तयार करणं याची विशेष आवड होती. त्यामुळेच त्याने ज्यु सेंटर सुरु करत त्याची आवड जोपासली. त्याच्या या ज्यूस सेंटरमध्ये ज्यूस सोबतच तो काही फास्टफूड्सदेखील सेल करतो. त्यामुळे कर्नाटकमध्ये त्याचं ज्यूस सेंटर चांगलंच लोकप्रिय आहे.
मोहम्मद आशिक विजयी झाल्यानंतर प्रसिद्ध शेफ आणि मास्टरशेफ इंडियाचा जज रणबीर ब्रार याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत त्याचं अभिनंदन केलं. 'प्रेरणादायी सुरुवातीपासून ते आव्हानात्मक प्रवासापर्यंत, तू कधीच मागे हटला नाहीस आणि आणखी काही करण्याच्या उत्साहात कधीच थांबला नाहीस. मास्टरशेफ झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन,' असं कॅप्शन देत त्यांनी त्याचं अभिनंदन केलं.
दरम्यान, मास्टरशेफ इंडिया या स्पर्धत शेवटच्या राऊंडमध्ये त्याच्यासोबत नंबी जेसिका, रुखसार सईद हे स्पर्धक पोहोचले होते. परंतु, या दोघांना मागे टाकत मोहम्मद आशिकने बाजी मारली. त्यामुळे रुखसारला दुसऱ्या आणि नंबी जेसिकाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. यंदाच्या पर्वात विकास खन्ना, पूजा धिंग्रा आणि रणवीर ब्रार हे परिक्षक म्हणून होते.