राज चिंचणकरनाटक : ‘यदाकदाचित रिटर्न्स’रंगभूमीवर सातत्याने नवनवीन प्रयोग करत, मराठी नाटक सर्वार्थाने जागते ठेवण्याचे काम लेखक, दिग्दर्शक व अभिनेता अशी आघाडी सांभाळणाऱ्या संतोष पवार या अवलियाने केले आहे. रसिकांची नाडी अचूक ओळखण्याचे कसब संतोष पवारला अवगत आहेच आणि त्याचा परिणाम थेट त्याच्या नाटकांच्या यशावर झालेला दिसतो. ‘यदाकदाचित रिटर्न्स’ हे त्याचे पुढचे पाऊल आहे आणि या नाटकातून त्याने अफलातून अशा १६ पात्रांच्या धिंगाण्यासह, मनोरंजनाचा ‘सोळा’क्षरी मंत्र दिला आहे.
संतोष पवारचे नाटक म्हणजे, त्यात नाना स्वभाववैशिष्ट्ये असणाºया विविध आगंतुक पात्रांचा समावेश असणार हे ठरून गेले आहे. याला हे नाटकही अपवाद नाही. या नाटकात संतोषने १६ पात्रांची मोट कमालीच्या ताकदीने बांधली आहे. यातल्या धिंगाण्याने रसिकांचे गाल पुरते दुखतील, याची शंभर टक्के हमी देणारी संहिता त्याने लिहिली आहे. अर्थात, नाटकाचे दिग्दर्शनही त्याचेच असल्याने, खास ‘संतोष पवार टच’ची झिंग नाट्याला चढली नसती, तर ते नवल ठरले असते. संतोष पवारचा विशेष असा चाहतावर्ग आहेच, परंतु सर्वसामान्य रसिकांना काय हवे, याची उत्तम जाण असलेल्या या अवलियाने त्यांनाही नाटकाकडे खेचून आणण्याचा यातून प्रयत्न केला आहे.
या नाटकातली ‘स्मार्ट’ १६ पात्रे ही या नाटकाची शान आहे. एकमेकांशी काडीचाही संबंध नसणारी पात्रे जेव्हा गुण्यागोविंदाने नाटकात एकत्र नांदतात, तेव्हा त्या नाटकाचा कर्ताकरविता संतोष पवारशिवाय इतर कुणी असू शकणार नाही, याची खात्री पटतेच. बाहुबली, कटप्पा, देवसेना, भल्लालदेव आदींच्या रांगेत विक्रम आणि वेताळ, शाहिस्तेखान, बिरबल, क्रिकेटपटू, न्यायदेवता, बाबाश्री, शांताबाई वगैरे पात्रे कशी काय बसू शकतात; हे तो एकटा संतोष पवारच जाणे! पण यातून बिघडत काहीच नाही; हे महत्त्वाचे! कारण या सगळ्यांचे एकजिनसीकरण त्याने ज्या बेमालूम पद्धतीने केले आहे, त्याने रसिकांचा ‘पैसा वसूल’ होण्याची निश्चिती झाली आहे. ही सगळी पात्रे हातात हात घालून मुक्तपणे नाटकात धिंगाणा घालतात आणि संतोष पवारच्या ‘रिटर्न्स’चा हा प्रयत्न अजिबात वाया गेला नसल्याचे दाखवून देतात.नव्या दमाच्या तब्बल १६ कलावंतांनी या नाटकाचा अवघा भार ज्या आत्मविश्वासाने पेलला आहे, ते पाहता हे कलावंत ‘नवीन’ आहेत, यावर विश्वास बसणे कठीण जाते. कसलीही चूक न करता, चोख पाठांतरासह लवचिक, कायिक अभिनयातून त्यांनी रंगमंचावर ‘संतोष’ पसरवलेला आहे. या भूमिका साकारताना प्रचंड दमछाक होत असतानाही, नाव ठेवायला कुठे जागाच राहू नये, अशा पद्धतीचे अनोखे उदाहरण नटमंडळींनी सादर केले आहे.
शर्वरी गायकवाड हिने साक्षात देवसेना उभी करताना भन्नाट कामगिरी केली आहे. बारीकसारीक गोष्टींचे अचूक व्यवधान तिच्या ठायी असल्याची प्रचिती तिने या भूमिकेतून आणून दिली आहे. नरेश वाघमारे याचा कटप्पा भाव खाऊन जाणारा आहे. ऋषिकेश शिंदे याचे बाबाश्रींच्या भूमिकेतले बेअरिंग लाजवाब आहे. प्रसाद बेर्डे (बाहुबली), प्रदीप वेलोंडे (भल्लालदेव), रविना भायदे (आयेश्री), धनंजय धुमाळ (बिरबल), संतोष वडके (वेताळ), हर्षद शेट्टे (शाहिस्तेखान), वर्षा कदम (न्यायदेवता), स्नेहल महाडिक (शांताबाई), अविनाश थोरात (आगंतुक), अमर मोरे (सेवक), नंदू जुवेकर व तेजस (तुतारीवाले) या सगळ्यांची भन्नाट अदाकारी व टीमवर्क वाखाणण्याजोगे आहे.या नाटकाचा गाभा नीट ओळखून अजय पुजारे याने उभारलेले रंगबिरंगी नेपथ्य आकर्षक आहे, तर चेतन पडवळ याने खेळलेला प्रकाशाचा खेळ रंगतदार झाला आहे. संगीताची महत्त्वाची जबाबदारी प्रणय दरेकर याने आश्वासकरीत्या पेलली आहे. धनंजय साळुंखे याची ढोलकी मस्त वाजली आहे. अनिकेत जाधव (नृत्ये), किशोर पिंगळे (रंगभूषा) यांच्यासह सर्वच तंत्रज्ञांची उत्तम साथ या संपूर्ण नाट्याला लाभली आहे. ‘श्री दत्तविजय प्रॉडक्शन’ने हे नाटक रंगभूमीवर आणून केवळ दोन-चारच नव्हे, तर सोळा घटका करमणूक करण्याचा विडा उचलला आहे.