बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना (twinkle khanna) हिचा पूर्वीपेक्षा आता कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, सोशल मीडियावर ती कायम चर्चेत येत असते. समाजात घडणाऱ्या कोणत्याही घटनेवर ट्विंकल उघडपणे व्यक्त होते. यात बऱ्याचदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. मात्र, यावेळी ती तिच्या शिक्षणामुळे चर्चेत आली आहे. वयाच्या 48 व्या वर्षी ट्विंकल खन्ना शिक्षणासाठी लंडनला गेली आहे.
ट्विंकल खन्ना सध्या लंडन विद्यापीठातील प्रसिद्ध गोल्डस्मिथमध्ये फिक्शन रायटिंगमध्ये मास्टर्स करत आहे. तिने तिच्या महाविद्यालयीन जीवनाची एक झलक शेअर केली आहे आणि वयाच्या 48 व्या वर्षी ती कशी शिकत आहे याचा अनुभव तिने सांगितला आहे.
ट्विंकल खन्नाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात अभिनेत्रीच्या कॉलेज लाइफची झलक पाहायला मिळते. ट्विंकल कॉलेजमध्ये जाते, तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत कॉफी घेताना आणि कॉलेजमध्ये धमाल करताना अनुभव शेअर केला आहे. ती तिच्या कॉलेजसमोर पोज देतानाही दिसत आहे.
हा व्हिडिओ शेअर करताना ट्विंकलने म्हटलं आहे की, "वयाची पन्नाशी उलटल्यावर शिक्षणासाठी विद्यापीठात परत जाण्यासारखे काय आहे? मला इथे क्लासला येऊन 9 महिने झाले आहेत आणि मी माझं मास्टर्स पूर्ण करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. सबमिशन आणि ग्रेडच्या शोधात मी कॉफीचे हजारो मग संपवेन हे कोणाला माहीत होतं? कधीकधी मला वाटते की मी लिहिण्याऐवजी मी विविध भन्नाट पर्याय अशा विषयात मास्टर्स करायला पाहिजे होतं.'
पुढे ट्विंकल म्हणते, "पण दुसरीकडे, मला हे सर्व नवे अनुभव असतील आणि माझ्या मैत्रिणींची गँग ज्यांच्यावर मी विश्वास ठेकू शकते मला डेडलाइनमधून बाहेर निघायला मदत करतील लंच ब्रेकमध्ये मला हसवतील. घट्ट त्वचा, कमी झालेलं वजन आणि कधीही न संपणारी ऊर्जा, तुम्ही एकतर गमावलेल्या गोष्टी मोजू शकता किंवा तुम्ही काय मिळवले आहे ते पाहू शकता. वृद्धत्व हे फक्त एक गणितीय समीकरण आहे. वजाबाकी म्हणून पाहण्यापेक्षा मी त्याला गुणाकार बेरीज मानेन.' अशा भावना ट्विंकल खन्नाने व्यक्त केल्या आहेत.
चाहते सध्या ट्विंकलचं कौतुक करत तिला शुभेच्छा देत आहेत. ट्विंकलच्या या पोस्टवरून ती लंडनमध्ये लेखनाशी संबंधित कोर्स करतेय असं दिसत आहे. ट्विंकलचा नवरा सुपस्टार अक्षय कुमारही अधूनमधून लंडनला जातो आणि तिच्यासोबत वेळ घालवतो.