बॉलिवूड अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्नाने (Twinkle Khanna) नुकतेच ब्रिटनच्या किंग चार्ल्सच्या राज्याभिषेक सोहळ्यावर टिप्पणी केली. तिने गंमतीत का होईना पण महत्वाच्या मुद्द्यांना हात घालत प्रश्न विचारला. या बहुप्रतिष्ठित राज्याभिषेकावर टीका करताना तिने कोहिनूर हिरा आणि बाकी दोन अनमोल रत्नही परत करण्याचीही मागणी केली आहे.
एका वृत्तपत्रातील आपल्या कॉलममध्ये ट्विंकलने लिहिले,"पारंपारिकरित्या राज्याभिषेक सोहळ्यात कोहिनूर हिऱ्यासोबत मुकूट परिधान करणं गरजेचं असतं. या निमित्ताने ब्रिटीश पॅलेसकडून एक वक्तव्य करण्यात आलं की, राज्याभिषेक सोहळ्यात कोहिनूरचा उपयोग केला जाणार नाही. यामुळे भारतीयांनी पुन्हा एकदा कोहिनूर परत द्या अशी मागणी सुरु केली आहे. मी ब्रिटनकडून फक्त कोहिनूरच नाही तर बाकी दोन अनमोल रत्न, विजय मल्ल्या आणि ललित मोदी यांनाही परत पाठवण्याची मागणी करु इच्छिते."
ट्विंकलने ब्रिटनचे पंतप्रधान ऋषि सुनक यांच्याविषयी लिहिले आहे. ती म्हणते,"तुमच्या कारकिर्दीने तुम्ही सर्वांनाच आश्चर्यचकित केलं पण तुमच्या सासूला नाही." नुकतंच प्रसिद्ध लेखिका आणइ ऋषि सुनक यांच्या सासू सुधा मुर्ती म्हणाल्या,"मी माझ्या पतीला बिझनेसमन केलं तर माझ्या मुलीने तिच्या पतीला पंतप्रधान केलं." सुधा मुर्तींच्या याच विधानावरुन ट्विंकलने हा टोमणा मारला.