Join us

मराठीच्या ‘दुनियादारी’ची दोन वर्षे

By admin | Published: July 22, 2015 2:07 AM

‘दुनियादारी’मध्ये काय होतं? खरं तर सुहास शिरवळकर यांची ही ऐंशीच्या दशकातील कादंबरी. पुण्यातील एस. पी. कॉलेजचं वातावरण. त्या काळाच्या तुलनेत कितीतरी पुढे असणारी पात्रे

‘दुनियादारी’मध्ये काय होतं? खरं तर सुहास शिरवळकर यांची ही ऐंशीच्या दशकातील कादंबरी. पुण्यातील एस. पी. कॉलेजचं वातावरण. त्या काळाच्या तुलनेत कितीतरी पुढे असणारी पात्रे. पण दिग्दर्शक संजय जाधव यांनी ती पडद्यावर अशी साकारली, की काळाचा पट ओलांडून ती पुढे आली. श्रेयस तळवलकर हा साधा, सालस, निरागस कॉलेजमध्ये नुकताच जाऊ लागलेला कथानायक (तसे कथानायक नाही म्हणू शकत. दिग्या, मीनू सगळेच कथानायक).स्वप्नील आणि सईच्या जोडीने चित्रपटाचे रसायन असे जमवले की तरुणाईच्या बॉक्स आॅफीसवर उड्या पडल्या. २५ कोटींचा गल्ला जमवून एक विक्रम झाला. पहिल्या आठवड्यातच दुनियादारीने २़८५ कोटींचा गल्ला जमविला आणि त्यानंतर जवळपास २८ कोटींचा व्यवसाय या चित्रपटाने केला. दुनियादारीनंतर ७२ मैल एक प्रवास, नारबाचीवाडी, यलो, काकस्पर्श, टाईमपास, फँड्री, एक हजाराची नोट, लय भारी, पोश्टर बॉईज, रमा माधव, प्यारवाली लव्ह स्टोरी, लोकमान्य : एक युगपुरुष, क्लासमेट्स, मितवा, काकणपासून ते अगदी लेटेस्ट म्हटले तर कोर्ट, व्हॉट अबाऊट सावरकर, टाईमपास २, अ पेईंग घोस्ट, संदूक, नागरिक, किल्ला, शटर, मर्डर मेस्त्री, बायोस्कोप या चित्रपटांनी पुन्हा एकदा प्रेक्षकवर्ग चित्रपटगृहाकडे आणला. दुनियानादारीनंतर ‘टाईमपास’ने ३२ कोटींच्यावर व्यवसाय केला, तर ‘लय भारी’ने २८ कोटींच्यावर जाऊन दुनियादारीचा विक्रम मोडला. पण या सगळ्यांमध्ये ‘दुनियादारी’चे महत्त्व यासाठी, की त्यांनी चित्रपटाची भाषा बदलली, वातावरण बदलले.एकेकाळी मराठी चित्रपटांच्या नावाने नाके मुरडणारी तरुणाई रांगा लावून मराठी चित्रपटांना जात असल्याचे चित्र दिसत आहे. मराठी चित्रपटांनी आशय आणि विषयांमध्ये तर बाजी मारलेलीच आहे; पण बॉक्स आॅफिसवरही मराठी चित्रपट हिट होऊ लागले. मराठीच्या या यशामध्ये ‘दुनियादारी’ने आपले स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. ‘दुनियादारी’ने प्रथमच २५ कोटी रुपयांच्या कलेक्शनचा टप्पा ओलांडला आणि पुढे येणाऱ्या चित्रपटांना कोटींचे आकडे पार करण्याचे स्वप्न दाखविले.

दुनियादारीने मराठी चित्रपटसृष्टीला पुन्हा एकदा चांगले दिवस आले, ही अभिमानाची गोष्ट आहे. यामुळे घेतलेल्या कष्टाचे चीज झाले आणि नवीन कामासाठी एनर्जीही मिळाली.- संजय जाधव, दिग्दर्शक

इंडस्ट्री वाढविण्यासाठी रेकॉर्ड मोडणे जरूरीचे असते. कारण त्यामुळे इंडस्ट्रीच केवळ मोठी होत नाही तर निर्मातेही गुंतवणूक करण्याची रिस्क घेतात. या चित्रपटामुळे फक्त इंडस्ट्रीचेच नाही तर कलाकारांचेही आयुष्य बदलले आहे.-सई ताम्हणकर, अभिनेत्री

मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांना वळवण्याचे कठीण काम दुनियादारीने यशस्वी करून दाखवले, याचे खूप कौतुक वाटते. दुनियादारीपुढे कितीही सुपरहिट चित्रपट आले तरी दुनियादारीने प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलेले स्थान अढळ राहील.-स्वप्नील जोशी, अभिनेता