Join us

नूतन यांनी या कारणामुळे मारली होती संजीव कुमार यांच्या कानाखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 11:03 AM

नूतन यांनी चारचौघांमध्ये संजीव कुमार यांना मारले होते. त्यांनी संजीव कुमार यांना का मारले होते हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.

नूतन यांनी संजीव कुमार यांच्या कानाखाली लगावली होती हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल. पण हे खरे आहे... नूतन यांनी चारचौघांमध्ये संजीव कुमार यांना मारले होते. नूतन यांच्यासोबत काम करताना संजीव कुमार त्यांच्या प्रेमात पडले होते. नुतन यांना त्यांनी लग्नाची मागणीही घातली होती. त्यावेळी नुतन यांचे लग्न झालेले होते. त्यामुळे त्या संजीव कुमार यांच्याकडे दुर्लक्ष करत होत्या. पण नूतन आणि संजीव कुमार यांच्या अफेअरची चर्चा त्याकाळात मीडियात चांगलीच रंगली होती. नूतन आणि त्यांचे प्रेमप्रकरण सुरू असल्याचे प्रसारमाध्यमांमध्ये संजीव कुमार यांनीच पसरवले असल्याचे नूतन यांना वाटत होते. त्यामुळे नूतन यांनी चिडून चारचौघांमध्ये त्यांच्या कानाखाली लगावली होती.संजीव कुमार यांच्या व्यवसायिक जीवनाइतकेच त्यांचे वैयक्तिक जीवन देखील चांगलेच गाजले. नूतन यांच्यानंतर संजीव कुमार हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले होते. संजीव कुमार यांनी शोले, सीता और गीता यांसारख्या चित्रपटात हेमा मालिनी यांच्यासोबत काम केले होते. संजीव हे हेमा मालिनी यांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. पण त्यांच्या दारुच्या व्यसनामुळे हेमा मालिनी यांच्या आईने या नात्याला विरोध केला. त्याचदरम्यान संजीव कुमार आणि सुलक्षणा पंडित यांच्या नात्याचीही खूप चर्चा होती. सुलक्षणा आणि संजीव कुमार हे खूप चांगले मित्रमैत्रीण होते. संजीव कुमार यांना हेमा मालिनी आवडत असल्याने त्यांनी सुलक्षणा यांच्या प्रेमाला होकार दिला नाही असे म्हटले जाते. सुलक्षणा यांनी संजीव कुमार यांच्या मृत्यूनंतर लग्न न करण्याचा निर्णय घेतला. त्या आजन्म अविवाहित राहिल्या.

संजीव कुमार यांची कारकिर्द ही केवळ काही वर्षांची असली तरी बॉलिवुडमधील महान अभिनेत्यांपैकी त्यांना एक मानले जाते. त्यांनी आंधी, खिलोना, मौसम, कोशिश, शोले, पती पत्नी और वो, अंगुर यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये अतिशय सरस भूमिका साकारल्या. त्यांचा मृत्यू 6 नोव्हेंबर 1985ला वयाच्या अवघ्या 47व्या वर्षी झाला. संजीव कुमार यांचे खरे नाव हरिभाई जेठालाल जरीवाला. त्यांचा जन्म सुरतमध्ये झाला. त्यांचे कुटुंबीय त्यांच्या जन्माच्या काही वर्षांनंतर मुंबईत स्थायिक झाले. अभिनयाची आवड असल्याने मुंबईत आल्यावर त्यांनी अभिनय शिकण्यासाठी निर्माते एस.मुखर्जी यांच्या फिल्मालय या अॅक्टिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतला. एस. मुखर्जी यांच्या हम हिंदुस्तानी या चित्रपटाद्वारे संजीव कुमार यांनी बॉलिवुडमध्ये प्रवेश केला. या चित्रपटात एस.मुखर्जी यांचा मुलगा जॉय मुखर्जी प्रमुख भूमिकेत होता. संजीव कुमार यांची या चित्रपटातील भूमिका खूपच छोटी असून त्यांना या चित्रपटात एकही संवाद नव्हता. त्याच दरम्यान त्यांनी अनेक गुजराती नाटकांमध्ये काम केले. 

संजीव कुमार मुंबईत आल्यानंतर गिरगाव येथील एका चाळीत राहात होते. त्यानंतर त्यांनी पाली हिलमध्ये फ्लॅट घेतला. दिलीप कुमार, सायरा बानू, सुनील दत्त, नर्गिस हे नंतरच्या काळात त्यांचे शेजारी होते. संजीव कुमार यांच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक करण्यात आले. त्यांना फिल्मफेअरकडून 14 वेळा नामांकन मिळाले होते. त्यांना दोन वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर एकदा सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्याच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. 

टॅग्स :संजीव कुमारहेमा मालिनीनुतन